साखळीतील तीन प्रभाग ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’

dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना संसर्गाचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखण्यासाठी साखळीतील तीन प्रभागात ‘मायक्रो (सुक्ष्म) कंटेनमेंट झोन’ घोषित करण्यात आले आहेत. आज (मंगळवारी) सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिका मंडळासमवेत महत्वाची बैठक घेवून ‘कोविड-१९’चा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कडक उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश पालिका मंडळाला दिले आहेत. त्यानंतर सायंकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आय. आर. मेनका यांनी कंटेन्मेंट झोनसंबंधीचा आदेश जारी केला आहे.

डिचोली
देसाईनगर, भंडारवाडा आणि गावठण प्रभागातील काही भाग विकेंद्रीत करून ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ घोषित करण्यात आले आहेत, तर तिन्ही प्रभागातील उर्वरीत भाग ‘बफर झोन’ जाहीर करण्यात आले आहेत. ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’मध्ये अडकलेल्या जनतेला प्रशासनातर्फे दूध, भाजी, कडधान्य आदी जीवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यात येणार आहे. त्या भागात कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्‍त मामलेदार अपुर्वा कर्पे, अक्षया आमोणकर आणि श्रीपाद माजिक यांची उप दंडाधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली.
साखळीतील देसाईनगर आणि भंडारवाडा प्रभागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून आले आहेत. मुजावरवाडा, भंडारवाडा, देसाईनगर पाठोपाठ गावठण प्रभाग काल ‘सील’ करण्यात आला आहे.
देसाईनगर, सुंदरपेठ आणि रुद्रेश्वर कॉलनी-हरवळे येथे प्रत्येकी एक मिळून आज साखळी शहरात आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. साखळीत संसर्ग झालेला अन्य एक रुग्ण साखळी पालिका क्षेत्राबाहेरील सर्वण परिसरातील आहे. कालपर्यंत साखळीत २६ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आतापर्यंत साखळीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. देसाईनगरात सर्वाधिक ११ रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात साखळी सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे साखळीतील एकूण १५२ जणांची स्वॅब चाचणी केल्याची माहिती मिळाली आहे.

 

संबंधित बातम्या