रुग्‍णसंख्‍या दोन हजारच्‍या उंबरठ्यावर

Dainik Gomantak
बुधवार, 8 जुलै 2020

पॉझिटिव्‍ह रुग्णांमध्ये विमान, रेल्वे आणि रस्तामार्गे आलेल्या ११६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्‍ण महत्त्‍वाच्‍या शहरांसह आता ग्रामीण भागातही आढळत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मांगोरहिलमधील ४४ रुग्ण, तर मांगोरहिलशी संबंधित २४२ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये मडगाव येथील २३ रुग्ण, केपे येथील १२, नावेली येथील २, साखळी येथील ४४, वेर्णा येथील ९, फोंड्यातील ११, उसगावातील ६, डिचोलीतील १०, पेडणे येथील ८, काणकोण येथील ७, तर पर्वरी येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

पणजी :

ग्रीन झोन म्हणवून घेणाऱ्या गोव्यात पुढील दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दोन हजारपर्यंत पोहोचण्‍याची शक्यता आहे. गेल्‍या २४ तासांत ९० कोरोनाबाधित रुग्‍णांची भर पडली आहे, तर राज्यात आतापर्यंत १९०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ११५६ रुग्णांची प्रकृती सुधारली आहे, तर राज्यात सध्‍या ७३९ कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत. दिवसाला सरासरी ७०च्या संख्येत रुग्ण आढळत असल्याने ही चिंताजनक बाब आहे.
आरोग्य खात्याने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार २ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आणि ११८ देशी प्रवाशांना क्वारंटाईन केले आहे. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये १२ जणांना ठेवले असून २८३० जणांच्या कोरोना पडताळणी चाचण्या आज करण्यात आल्या. यातील २१४७ कोरोना पडताळणी अहवाल हाती आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्‍ह रुग्णांमध्ये विमान, रेल्वे आणि रस्तामार्गे आलेल्या ११६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्‍ण महत्त्‍वाच्‍या शहरांसह आता ग्रामीण भागातही आढळत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मांगोरहिलमधील ४४ रुग्ण, तर मांगोरहिलशी संबंधित २४२ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये मडगाव येथील २३ रुग्ण, केपे येथील १२, नावेली येथील २, साखळी येथील ४४, वेर्णा येथील ९, फोंड्यातील ११, उसगावातील ६, डिचोलीतील १०, पेडणे येथील ८, काणकोण येथील ७, तर पर्वरी येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

राजधानीवरही कोरोनाचे सावट...
पणजी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागल्याने राजधानी पणजीवरही आता कोरोनाचे सावट आहे. कामराभाट येथे ७ रुग्ण, ताळगाव येथे १, शंकरवाडी येथे ४, बांबोळी आणि कुजिरा सांताक्रूझ येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत.

कोविड रुग्णालयातील १०६ खाटा रुग्णांसाठी वापरल्‍या जात असून तेथे रुग्‍णांवर उपचार केले जात आहेत. उर्वरित खाटा रिकाम्‍या आहेत. ज्‍या रुग्णांना कोरोना संसर्गाची लक्षणे नाहीत त्यांनाही कोविड केअर सेंटरमध्ये देखभालीखाली ठेवण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरेपी प्रशिक्षणासाठी राज्यातील काही डॉक्टरांना एम्स रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.
-विश्वजित राणे, आरोग्‍यमंत्री
००००

कोरोना योद्ध्यांना संसर्ग
मुरगाव पालिका इमारत, वास्को पोलिस स्थानका बरोबर आता वास्को विद्युत भवनसुद्धा कोरोना संक्रमित बाधित रुग्ण आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्को वीज विभागाची मुंडवेल येथील विद्युत भवनात पाच संशयित कोरोनाबाधित सापडल्याने स्‍थानिकांत भीतीचे वातावरण आहे. फोंडा पोलिसांबरोबरच आता अग्निशामक दलाचेही जवान कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. कुंडई येथील अग्निशामक दलाचा एक जवान (कुर्टी येथील) पॉझिटिव्ह सापडला आहे. तसेच पणजी मुख्यालयातही पॉझिटिव्ह सापडू लागल्याने इतरांनीही आपली चाचणी करवून घेण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, वाडी - तळावली येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोनाची लागण झाली असून इतर साठपेक्षा जास्त लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर दिवसभरात आयडी इस्पितळात फोंड्याबरोबरच इतर ठिकाणचे वीसपेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मोतिडोंगर येथील
७१५जणांचे अहवाल प्रतीक्षेत
मोतिडोंगर येथे सोमवारी केलेल्‍या ७१५ जणांच्या कोविड चाचण्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. कोरोनाचे २२ रुग्ण मिळाल्याने मोतिडोंगर झोपडपट्टी ‘कंटेन्मेंट झोन’ करण्यात आली आहे. आठवड्याभरात मोतिडोंगर येथील सुमारे २००० जणांची कोविड चाचणी केली आहे. यापैकी सोमवारी केलेल्‍या ७१५ जणांच्या चाचण्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तीन दिवसांत कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्याने मोतिडोंगर झोपडपट्टीतील सुलभ शौचालय ते बीएसनएल क्वार्टर्स व रेणुका देवी मंदिर ते पाण्याची टाकी परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर केला आहे.

विर्डीत आणखी दोन रुग्‍ण सापडले
साखळी पालिका क्षेत्रातील विर्डी गावात आज आणखी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर साखळी मतदारसंघातील पाळी गावात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. विर्डी गावात काल चार रुग्ण आढळून आले होते. आज आणखी दोन रुग्ण आढळून आल्याने विर्डी गावातील रुग्णसंख्या सहा झाली आहे.

संबंधित बातम्या