नागरी हस्तक्षेपामुळे वाघांचा अधिवास धोक्यात

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

नागरी हस्तक्षेपामुळे वाघांच्या अधिवासात विभाजन होत आहे. वाघांच्या संख्या वाढीवर याचा परिणाम होत असून कॉरिडॉर संरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने भारतीय वन्यजीव संस्थेला यासंबंधी अभ्यास करून अहवाल सादर करण्याची परवानगी दिली आहे.

पणजी  : नागरी हस्तक्षेपामुळे वाघांच्या अधिवासात विभाजन होत आहे. वाघांच्या संख्या वाढीवर याचा परिणाम होत असून कॉरिडॉर संरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने भारतीय वन्यजीव संस्थेला यासंबंधी अभ्यास करून अहवाल सादर करण्याची परवानगी दिली आहे. गोवा आणि कर्नाटक सरकारच्या वन खात्यांमध्ये मात्र उदासीनता असल्याचे दिसून येते. (Tiger habitat threatened by civil intervention) 

'आप'ने सुरु केलेल्या ऑक्सिमीटर सेवेला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन वर्षांपूर्वी दांडेली येथील काळी व्याघ्र अभयारण्यातील एका वाघाला कॉलर आयडी लावून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. त्या वाघाने सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास केल्याचे स्पष्ट झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री, गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगडसह काळी अभयारण्य असा या वाघाचा प्रवास होता. २०२० मध्ये कर्नाटकातील कणकुंबी वनविभागानेसुद्धा असाच प्रयोग केला होता. यावेळी तेथील हुळंद परिसरात वावरणारा वाघ हा म्हादई, भीमगड आणि दोडामार्ग परिसरात फिरत असल्याचे आढळले होते. हाच वाघ चोर्ला घाटात वाहनांच्या समोर आला होता, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोव्यात तालुकावार कोविड उपचार केंद्रे

म्हादई, सह्याद्री, भीमगड आणि काळी अभयारण्य हा पश्चिम घाटाचा संलग्न प्रदेश आहे. या भागातील वाघांची संख्या मोठी असून त्यांचा संचार या सर्व प्रदेशात आढळून आला आहे. परिणामी, त्यांची निश्चित अशी गणना करता आलेली नाही. प्रत्येक अभयारण्य व्यवस्थापनाकडून त्यांच्या परिक्षेत्रातील वाघांची संख्या जाहीर केली जाते. ती अचूक असण्याची शक्यता कमी आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या तिन्ही राज्यांतील वनखात्यांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ते म्हादईचे खोरे आणि पुढे कॅसलरॉक- काळी नदीचे खोरे असा कॅरिडॉर संरक्षित करून वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता प्राणीमित्रांतून व्यक्त होत आहे.

कॅरिडॉर संरक्षित नसल्यामुळे वाघांचा लोकवस्तीत हस्तक्षेप वाढत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे नागरीकांना असुरक्षित वाटते. परिणामी, जंगलातील मानवी हस्तक्षेप वाढतो, त्याचे परिणाम वाघांच्या अधिवासावर होऊन पर्यायाने वन्यजीव-मानव संघर्ष पेटतो. महाराष्ट्र सरकारने कॅरिडॉर संरक्षणासाठी पाऊल उचलले असून गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनीही उदासीनता झटकण्याची गरज आहे.

म्हादई अभयारण्यातील वाघांच्या संरक्षणासाठी वनखाते प्रयत्नशील आहे. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेनंतर अधिक काळजी घेतली जात आहे. कॅरिडॉर संरक्षणासाठी लवकरच पावले उचलली जातील.

- संतोषकुमार, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक

भीमगड अभयारण्यात १६ वाघांची निश्चिती झाली आहे. त्यातील कांही वाघांचा संचार म्हादई, सह्याद्री आणि काळी अभयारण्यात असतो. कॅमेरा ट्रॅपींगमधून हे सिध्द झाले आहे. वरीष्ठांना याबाबत कल्पना दिली आहे. सरकारकडून तिन्ही राज्यांच्या संयुक्त मोहिमेबाबत निर्देश आल्यास निश्चितपणे त्यावर काम केले जाईल.

संबंधित बातम्या