तिळारीचा कालवा फुटला; उत्तर गोव्याला पाणीटंचाई जाणवणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

उत्तर गोव्याला पेयजलाच्या पुरवठ्यासाठी आणि सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारा तिळारी जलसिंचन प्रकल्पाचा डावा कालवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानयाळे येथे फुटला.

पणजी :  उत्तर गोव्याला पेयजलाच्या पुरवठ्यासाठी आणि सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारा तिळारी जलसिंचन प्रकल्पाचा डावा कालवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानयाळे येथे फुटला. यामुळे उत्तर गोव्यातील बागायतींसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आता आमठाणे धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता श्रीकांत पाटील यांनी दिली.

प्रजासत्ताक दिन 2021:  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण 

कालवा फुटल्यानंतर गाळ, मातीसह पाणी कालव्यापासून चार किलोमीटरपर्यंत पोचले. त्यामुळे दोडामार्ग कोल्हापूर मार्गावर असलेल्या साटेली-आवाडे येथील पुलावर पाणी येऊन त्या मार्गावरील वाहने दोन तासांहून अधिक काळ अडकून पडली.तिलारीतून गोव्याकडे पाणी नेणाऱ्या कालव्याला काही दिवसांपासून गळती लागली होती. त्यामुळे कालवा फुटणार याचे संकेत मिळत होते. अनेक शेतकऱ्यांनी त्याबाबत प्रकल्पाधिकाऱ्यांना कल्पना दिली होती; पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर आज दुपारी अडीचच्या दरम्यान कालवा फुटलाच. 

श्रेष्ठ भारतसाठी योगदान द्या: राज्यपाल कोश्‍यारी

दुसऱ्यांदा कालवा फुटला

कालवा फुटला त्याच्या वरच्या बाजूला काही वर्षांपूर्वी कालवा फुटून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा आता कालवा फुटला. फुटलेला कालवा नव्याने बांधलेला होता; पण काही वर्षांतच तो फुटल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

फुटलेला कालवा पुन्हा बांधण्यासाठी काही महिने जातील. त्या काळात गोव्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लवकरात लवकर पंचनामे, दुरुस्ती अंदाजपत्रक करून गोव्याला पाणी देण्याचे प्रयत्न राहतील.
- श्री. आसगेकर, प्रकल्पाधिकारी

संबंधित बातम्या