मोबाईलसाठी दागिने विकण्याची वेळ

Dainik Gomantak
गुरुवार, 18 जून 2020

ऑनलाईन शिक्षणाची सक्ती जनतेला काय काय भोगायला लावेल सांगता येत नाही.मोबाईल घेण्यासाठी काणकोणात मातेची धडपड. मुलाच्या शिक्षणासाठी दागिने विकण्याची महिलेवर वेळ

काणकोण

सरकार ऑनलाईन शिक्षणाची तयारी करत आहे, शिक्षकांना तसे प्रशिक्षणही दिले आहे. मात्र वास्तवात कित्येक पालकांची यासाठी स्मार्ट फोन घेण्याचीही ऐपत नाही. काणकोणात एका मातेने मुलाला स्मार्ट फोन घेऊन देण्यासाठी दागिने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दागिने विक्रीतून मोबाईल घेण्यासाठी पुरेसे पैसे येणार नसल्याने ते सारे निराश झाले आहेत. तो मुलगा नववीत शिकतो.

हे झाले एक उदाहरण. मात्र स्मार्ट फोन नसलेली अनेक कुटुंबे आहेत. स्मार्ट फोन घेण्याची ऐपत नसलेलेही अनेकजण आहेत. सा साऱ्यांची फरफट सरकारी कारभारात होऊ लागली आहे. वास्तवाचा विचार न करता सरकार फतवे काढत असते आणि त्याचा फटका गरीब जनतेला बसत असतो. टाळेबंदीच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. त्यातच आता पाल्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन कसा विकत घ्यावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.

मुलाने शिकून मोठे व्हावे, असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असते. एकवेळ आपली हौस बाजूला ठेवून आपल्या पाल्याची शिक्षणाची गरज पालक पूर्ण करत असतात. परंतु ही गरज भागविणे आपल्या आवाक्यात नसल्याची जाणीव त्यांना ज्यावेळी होते, त्यावेळी पालक व ते मूलही खचून जाते. अशीच एक घटना काणकोणात घडली आहे.
काणकोणातील काही विद्यालयांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आपले मूल ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतो. ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकाने स्मार्ट फोनचा क्रमांक मागितला आहे. दोन वेळच्या जेवणाची मारामार अशावेळी नववीत शिकणाऱ्या मुलाला मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे या विवंचनेत पालक असताना आईने आपल्या जवळचे दागिने विकून मुलाला मोबाईल घेऊन देण्याचे ठरविले. दागिने विकण्यासाठी ती सराफाकडे गेली. मात्र, त्या दागिन्यातून तिला फक्त चार-पाच हजार रूपये मिळणार असल्याने स्मार्ट फोन घेण्यासाठी उर्वरीत पैसे आणायचे कुठून हा प्रश्र्न तिच्यासमोर उभा राहिला. मोठा मुलगा बारावी शिकून बेरोजगार, करोना काळात वडीलावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली. त्यामुळे हे कुटूंब सध्या हलाखीचे जीवन जगत असताना मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील धडपडत आहे. त्याना आपले भवितव्य फारसे चांगले नसल्याचे जाणवू लागले आहे.
मोबाईल विकत घेण्यासाठी धडपणाऱ्या काणकोणातील संबंधित पालकांनी आपली कैफीयत चावडी येथील समाज कार्यकर्ते शंकर नाईक यांच्याकडे मांडली. या संदर्भात नाईक यांना विचारले असता, ऑनलाईन शिक्षणासाठी काणकोणात नेटवर्किंगची समस्या आहे. त्यातच काही पालकांना स्मार्ट फोन घेणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही. अशा वेळी ऑनलाईन शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी अशा मुलांना गृहपाठ घरपोच देण्याची व्यवस्था करायला हवी, अन्यथा ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत त्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची भीती आहे. त्यासाठी सरकारने शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या