तिरुमला तिरुपती पतसंस्था ‘ईडी’च्या घेऱ्यात?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील संशयित रिया चक्रवर्तीने ड्रग्जसंदर्भात संवाद साधलेल्यांमध्ये गौरव आर्या याचे नाव तपासात समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक हल्लीच गोव्यात येऊन गेले.

पणजी: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या गूढ मृत्यूप्रकरणाच्या चौकशीतून हणजूण येथील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याचे नाव समोर आले व त्याचे कपिल झवेरी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोव्यातील तिरुमला तिरुपती मल्टीपर्पज सहकारी पतसंस्थेच्या व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हणजूण येथील रेव्ह पार्टीप्रकरणी संशयित कपिल झवेरी याला अटक झाली होती. या पार्टीवेळी क्राईम ब्रँच पथकाने ड्रग्ज जप्त केला होता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील संशयित रिया चक्रवर्तीने ड्रग्जसंदर्भात संवाद साधलेल्यांमध्ये गौरव आर्या याचे नाव तपासात समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक हल्लीच गोव्यात येऊन गेले. त्यानंतर मनी लाँडरिंग संशयप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आर्या याच्या हॉटेलच्या प्रवेशद्वार समन्स चिटकवून त्याला आज (३१ ऑगस्ट) चौकशीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. या चौकशीत त्याच्या व संशयित झवेरी यांच्यातील संबंधाबाबत चौकशी होऊ शकते. 

मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या समन्सनुसार गौरव आर्या हा काल (३० ऑगस्ट) दाबोळी विमानतळावरून रवाना झाला होता. त्याने त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी कधी भेटच झाली नाही. रिया चक्रवर्ती हिच्याशी २०१७ मध्ये संवाद झाला होता व त्यानंतर कधीच ड्ग्जसंदर्भात चर्चा झाली नव्हती. मुंबई सक्तवसुली संचालनालय त्याला या प्रकरणात विनाकारण गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, नार्कोटिक्त कंट्रोल ब्युरोचे पथक ड्रग्जसंदर्भात चौकशी करण्यासाठी गोव्यात आले होते तेव्हा गौरव आर्या त्यांना सापडला नाही त्यामुळे ईडीने त्याची चौकशी केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथकही त्याची चौकशी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या