सुलभ शौचालयाअभावी प्रवाशांची होतेय कुचंबणा, विकासासाठी हवाय परिसस्पर्श!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

प्रवाशांसाठी तिस्क - उसगावात सुलभ शौचालय नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसतात. तिस्क - उसगावातून आंतरराज्य प्रवासी वाहतूक सुरू असल्याने ही कुचंबणा प्रकर्षाने जाणवत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

फोंडा ;मिनी शहराकडे वाटचाल सुरू असलेल्या तिस्क - उसगावात अत्यावश्‍यक सुविधा नसल्याने बाजार भागात ग्राहक तसेच प्रवाशांची अतिशय कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी तिस्क - उसगावात सुलभ शौचालय नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसतात. तिस्क - उसगावातून आंतरराज्य प्रवासी वाहतूक सुरू असल्याने ही कुचंबणा प्रकर्षाने जाणवत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

 तिस्क - उसगाव भागातून खाजगी प्रवासी मिनी बसगाड्यांबरोबरच कदंब महामंडळ व कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची वाहतूक सुरू असते.  तिस्क उसगाव बाजारात गेल्या वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला इंटरनॅशनल पे टॉयलेट असून त्याचा वापर होत नसल्याने ही कुचंबणा होत आहे. तिस्क उसगाव येथे पे टॉयलेट असल्याची कल्पना येथे उतरणाऱ्या प्रवाशांना नसल्याने गैरसोयीचे होत आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी कर्नाटक अथवा महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या बसगाड्यातून उतरणाऱ्या महिला प्रवाशांची बरीच गैरसोय होते. तिस्क उसगाव येथील उतरणारे प्रवासी रात्रीचा फायदा उठवत उघड्यावर शौच व लघुशंका करण्याचे प्रकार घडत आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे परराज्यातून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय बसेस बंद होत्या. सध्या कर्नाटक येथून येणाऱ्या प्रवासी बसेस सुरू झाल्या असून कित्येक बसेस प्रवाशाना तिस्क बसस्थानकावर उतरवून मडगाव, वास्को व पणजी या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहे. तिस्क उसगाव येथे रात्री उशिरा उतरणारे प्रवासी दिवस उजाडेपर्यंत रस्त्याकडेच्या दुकानाच्या आडोशाला बसून वेळ काढतात. परंतु प्रवाशांना शौचालयाची माहिती नसल्याने गैरसोयीचे बनत आहे. तिस्क उसगाव भागात सुलभ शौचालयाबरोबर बसस्थानकांची सुविधा नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनाच्या काळात मोजक्‍याच बसेस गोव्यात सुरू होत्या.

आता परराज्यातून येणाऱ्या प्रवाशी बसेसचे वेळापत्रक सुरू झाले असून अनमोड घाटावरील रस्ता दुरुस्तीसाठी प्रवासी बसेसना बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातून येणाऱ्या प्रवासी बसेस चोलामार्गे तिस्क उसगावच्या दिशेने प्रवाशांना घेऊन येतात. रात्रीच्या वेळेला प्रवाशांना उतरवल्यानंतरच ही समस्या उद्‌भवते. त्यामुळे संबंधितांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे आणि गोव्याची नाचक्की थांबवावी अशी मागणी तिस्क - उसगाववासीयांकडून करण्यात येत आहे. 
 

तिस्कला हवा मास्टर प्लॅन
फोंडा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तिस्क परिसराचा विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन आखणे गरजेचे आहे. तिस्क हे सध्या मिनी शहर होत असून बाजारपेठेबरोबरच अन्य ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लोक मुद्दामहून तिस्क येथे येतात. त्यामुळे या परिसरात ग्राहक तसेच प्रवाशांची कायम वर्दळ असते. वाढती लोकसंख्या आणि अपुरी साधनसुविधा यामुळे विशेषतः ग्राहक आणि प्रवाशांची होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन करणेच योग्य असल्याचे मत लोकांकडून व्यक्त होत आहे.

पीडीए मार्केटकडे आहे शौचालय
तिस्क - उसगावात पीडीए मार्केटजवळ सुलभ शौचालय आहे, मात्र त्याचा लाभ प्रवासी वर्गाला किचिंतच होतो. त्यातच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना नेमके शौचालय कुठे आहे, ते कळत नाही, त्यामुळेच रात्रीच्या वेळेला उघड्यावरच शौचविधी करण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे परिसर गलिच्छ ठरण्याची शक्‍यता असून कोरोनासारखी महामारी ज्या घाणीत तयार झाली, तसा प्रकार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

तिस्क - उसगाव येथे उतरणाऱ्या प्रवाशांना जवळच सुलभ शौचालयाची व्यवस्था झाल्यास ते सोयिस्कर ठरणार आहे. सध्या पीडीएच्या मार्केटजवळ असलेला पे टॉयलेटचा प्रवाशाना फायदा होत नसून प्रवाशांची होणारी गैरसोय सरकारने दूर करावी.
- सूरज गरड (तिस्क - उसगाव)

वास्तविक प्रवाशांसाठी अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी स्थानिक पंचायतींनीही लक्ष घालायला हवे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्यावेळेला बराच मनस्ताप सहन करावा लागतो, त्यामुळे यासंबंधी सरकारकडून आवश्‍यक कार्यवाही अपेक्षित आहे. 
- जयराम गावकर (धारबांदोडा)

संबंधित बातम्या