देवदैवतांच्या भूमित कला, साहित्य संस्कृतीचा वारसा

देवदैवतांच्या भूमित कला, साहित्य संस्कृतीचा वारसा
Tiswadi taluka is famous for its Art, literature and Cultural heritage

गोवा वेल्हा: तिसवाडी तालुका आपल्या वैशिष्ट्यासाठी प्रसिध्द आहे. यात प्रसिद्ध देवालये, प्रसिद्ध साहित्यिक, साहित्य, लोककला, संस्कृती,  क्रीडा, संगीत, कला आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

तालुक्यातील पणजी ही गोव्याची राजधानी आहे. येथील देवी महालक्ष्मी ही पणजीकरांचे दैवत आहे. सर्व धर्मांचे लोक या दैवताला भजतात. चांगल्या कार्याच्या शुभारंभ या देवीचे स्मरण करून तिची खणा नारळाने ओटी भरून तिचे आशीर्वाद मागतात. मंदिराचे पुरोहित गाऱ्हाणे घालतात. हिंदू बरोबर अन्य धर्मांचेही यासाठी या देवीच्या चरणी लीन होतात. पणजी शहरात अन्य धर्मांची प्रार्थना मंदिरे आहेत. तसेच शैक्षणिक संस्था, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान, मळा मारुती गडावरील प्रसिध्द मारुती मंदिर असून येथे वार्षिक मारुती रायाची जत्रा भरते. शिमगा, कार्निवल, ईद आदींच्या भव्य मिरवणूक पणजी शहरातून निघते. यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. सेंट्रल वाचनालय, विविध खात्याची कार्यालयांचा यात समावेश आहे. अनेक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, सांगीतिक कार्यक्रम येथे होतात. सार्वजनिक गणेशोत्सवही दरवर्षी उत्साहात साजरा होतो. दरवर्षी इफ्फीचे नेटके आयोजन करण्यात येते. गोवा कला अकादमीही चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करते.
बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळ व दंत महाविद्यालय लोकांच्या सेवेसाठी आहे. उपचारांसाठी दिवसातून बरेच रुग्ण येथे येतात. यात शेजारील राज्यांतील रुग्णांचा समावेश असतो. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ आदींचे येथे खास आयोजन होते. बांबोळी सैनिकी कॅंपमध्ये प्रशिक्षण दिले जाते. देशभरातून नव नवीन सैनिकी तुकड्या येथे प्रशिक्षण घेतात. 

शिरदोन गावातही वार्षिक उत्सव साजरे होतात. वडवड येथील वार्षिक होमखण प्रसिध्द आहे. होळीच्या दिवशी येथे शेकडो लोक पेटत्या अग्नी कुंडातून जातात. गोवा वेल्हा येथील संताचे पुरसांव प्रसिध्द आहे. यात एकूण ३१ फ्रान्सिस्कन संताच्या पूर्णाकृती मिरवणुकीत सहभागी केल्या जातात. पिलार येथील फा. आग्नेल मिशनरी संस्था उपदेश देण्याचे चांगले कार्य करते, दर गुरुवारी त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्या साठी गर्दी होते. येथील फा. आग्नेल फेस्त्तही प्रसिध्द आहे. सांतान येथील तवशाचे फेस्त अर्थात सांतान सायबीणीच्या फेस्ताला नवस फेडण्यासाठी भाविक गर्दी करतात.

तिसवाडीत डोंगरी येथील इंत्रुज संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. आठवडाभर या उत्सवाचे आयोजन असते. यात सुवारी वादन, इंत्रुज मेळ मिरवणुकीचा लोक आनंद लुटतात. इंत्रुज मंडपात गुलाल उधळला जातो. श्रीं सत्यनारायण महापूजेने इंत्रुज उत्सवाची सांगता होते. डोंगर माथ्यावरील मंदिरात वार्षिक अक्षय तृतीया साजरी होते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री सीता रामचंद्र मंदिरात सलग पंधरा दिवसांचा कीर्तन व मखरोत्सव साजरा होतो. डोंगरीचे सुपुत्र कृष्णम बांदकर यांनी हा उत्सव सुरु केला होता मराठी संगीत नाटकाचे उगम स्थान मान मानले जाते.प्रसिद्ध नाटककार अण्णा साहेब किर्लोस्कर यांनी डोंगरीला भेट देऊन व बांदकर याचे आशीर्वाद घेऊन संगीत नाटकांची निर्मिती केली. श्री गोळीबाबा, नागदेवता आदिची वार्षिक पूजा होते. जुने गोवे येथे सायवाचे फेस्त्त तर नाणिज मठात व गोमतेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी होते. तिसवाडीने राज्याला अनेक अनमोल रत्ने दिली. यात साहित्यिक, लेखक, संगीतकार.सिने कलावंत, डॉक्टर, मुर्तीकार, चित्रकार, सजावटकार, भजनी कलाकार, कवी, शिल्पकार, गायक, वादक, कीर्तनकार, नाटककार, धर्मगुरू, दिग्दर्शक, प्राचार्य, शिक्षक, क्रीडापटू, प्रशिक्षक, ग्राफिक डिझाईनर, आध्यात्मिक गुरु आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com