मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोवा योजनेचा आढावा घेण्यासाठी पंच व सरपंचांशी साधणार संवाद

दैनिक गोमन्तक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज दुपारी १२ वाजता स्वयंपूर्ण गोवा योजनेचा आढावा घेण्यासाठी पंच व सरपंचांशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत.

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज दुपारी १२ वाजता स्वयंपूर्ण गोवा योजनेचा आढावा घेण्यासाठी पंच व सरपंचांशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत. आत्मनिर्भर भारत ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केल्यानंतर स्वयंपूर्ण गोवा ही योजना मुख्यमंत्र्यांनी जारी केली आहे.

१ ऑक्टोबरपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गाव स्वयंपूर्ण होण्याला कशाची गरज आहे याची माहिती संकलित करण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात केल्यानंतर पंच व सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. या योजनेसाठी नियुक्त केलेले सरकारी कर्मचारी या पंचायतीत दर शनिवारी उपलब्ध असतात. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त केले आहेत.

सचिव आणि मंत्रीही पुढील टप्प्यात या पंचायतींना भेट देणार असे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवा योजनेत काय करायचे आहे याविषयी मार्गदर्शन केले होते. काही पंचायतींच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या होत्या. बहुतांशजणांनी शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांनी पैसे भरूनही सरकारने अनुदान न दिल्याने कामे सुरू न झाल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर तीन महिन्यात हा प्रश्न सुटेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर उद्या मागील बैठकीत काय ठरले होते व ती कामे कुठवर आली याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. या आभासी बैठकीला पंचायत संचालक नारायण गाड हेही उपस्थित राहणार असून ते बैठकीचे संचालन करतील. या बैठकीच्या अखेरीसही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी पंच व सरपंचांना देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या