राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद आज गोव्‍यात

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिनाच्‍या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गोव्‍यात येतील.

पणजी : गोवा मुक्तिदिनाच्‍या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गोव्‍यात येतील. ते हवाई दलाच्या खास विमानाने दाबोळी विमानतळावर उतरतील तेथून हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठ परिसरात उतरुन राजभवनावर जाणार आहेत. ते आझाद मैदानावर हुतात्मांना आदरांजली वाहतील आणि सायंकाळी सहा वाजता कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणाऱ्या समारंभात सहभागी होणार आहेत.

कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर सायंकाळी सहा वाजता गोव्‍याचा मुक्तिसंग्राम तसेच कला व संस्कृतीचा समावेश असलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मुख्य सोहळ्यात स्वागतासाठी ‘भांगराळे गोंय’ या संस्थेने तयार केलेल्या कोकणी गीत सादर केले जाणार आहे. गोव्यातील मुक्तिसंग्राम व त्याचा पूर्वेतिहास तसेच कला व संस्कृती यासंदर्भातचा १० मिनिटांचा माहितीपट दाखविला जाणार आहे. त्यानंतर व्यासपीठावर माझ्यासह राज्यपाल व राष्ट्रपतींची गोमंतकियांना संबोधन करणारी भाषणे होतील. त्यानंतर पंधरा मिनिटांनंतर राष्ट्रपती प्रेक्षकांबरोबर बसून पुढील पाऊण तासाचा कार्यक्रम पाहणार आहेत. ‘गोंयचो गाज’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सर्व तालुक्यांमधून सुमारे १२ पथके गोव्याच्या कला व संस्कृती या कार्यक्रमातून घडविणार आहेत. राष्ट्रपतींच्या गोवा भेटीमुळे पणजीत पोलिस सुरक्षा छावणीचे स्वरुप निर्माण झाले आहे.

हुतात्‍म्‍यांच्‍या आदरांजली वाहणार
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्‍ट्रपतींचे दाबोळी विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठ येथील हेलिपॅडवर उतरतील व राजभवनावर रस्ता मार्गाने रवाना होतील. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते तेथे असतील. संध्याकाळी ५.४० वाजता ते आझाद मैदानावरील गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते कांपाल येथील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींची उपस्थिती असणारा २० डिसेंबरला कोणताही सरकारी कार्यक्रम नसून ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. या दिवशी संध्याकाळी ५.३० वा. ते गोवा विद्यापीठ हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने दाबोळी विमानतळावर जातील व तेथून ते दिल्लीला रवाना होतील.

आणखी वाचा;

६० व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांना दिल्या शुभेच्छा -

 

संबंधित बातम्या