टोमॅटो-बटाट्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ

Dainik Gomantak
सोमवार, 22 जून 2020

मागील आठवड्यात २० ते ३० रुपयांवर आलेला टोमॅटो आता ४० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याचे दर मात्र दिवसेंदिवस खाली येत आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपयांवर आलेला कांदा आता १५ रुपये किलोने विकला जात आहे.

पणजी,

महापालिकेच्या येथील मार्केटमधील खुल्या भाजीपाला विक्रेत्यांकडे गत आठवड्याच्या तुलनेत टोमॅटो आणि बटाट्याच्या दरात सरासरी दहा रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटो आणि बटाट्याची आवक कमी झाल्याने त्याच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, तर कांद्याचे दर मात्र खाली येत असून सध्या तो १५ रुपयांवर पोहोचला आहे. परंतु निवडक कांदा मात्र २० रुपये किलोने विकला जात आहे.
बेळगाव भाजीपाला मार्केटमधून गोव्यात नियमित भाजीपाला येत आहे. परंतु टोमॅटोची आवक मात्र कमी झाली आहे. पावसाचा परिणाम टोमॅटो पिकावर झाल्याने त्याची आवकच बेळगावमध्ये कमी झाली असल्याने आपोआप त्याचा परिणामही गोव्यातील दरावर झाला आहे. मागील आठवड्यात २० ते ३० रुपयांवर आलेला टोमॅटो आता ४० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याचे दर मात्र दिवसेंदिवस खाली येत आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपयांवर आलेला कांदा आता १५ रुपये किलोने विकला जात आहे. त्याशिवाय इतर भाज्यांच्या दरातही घसरण होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, मासळी बाजारातही गेल्या आठवड्याप्रमाणे मोजक्याच मासळीची आवक झाली. यावेळी मुंडुशे जास्त प्रमाणात विक्रीस आलेले दिसले. बांगड्यालाही यावेळेस मागणी होती, तर सुंगटे आणि खेकडेही बाजारात विक्रीस दिसत होते. यात मुंडुशे माशाचे ५ नग २५० ते ३०० रुपयांना विकले जात होते, तर बांगड्याचा आकारामानानुसार २०० ते २५० रुपयांना वाटा विकला जात होता. मोठे झिंगेही ३०० ते ४०० रुपयांना वाट्याच्या स्वरूपात मिळत होते.

भाजीपाल्याचे किलोचे दर (प्रती किलो रुपयांत)
कांदा - १५
बटाटा - ४०
टोमॅटो - ४०
गवार - ४०
गाजर - ४० ते ६०
दोडके - ४०
भेंडी - ४०
कोबी - २०
फ्लावर - २० ते ४०
वांगी - ४०
कोथिंबीर - २० ते ३०
लसूण - १०० ते २००
आले - ८० ते १५०

 

 

संबंधित बातम्या