फोंड्यात कोरोना बळींचा आकडा ५१ वर!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना अजून नाहिसा झालेला नाही. फोंड्यात कोरोनाचे आतापर्यंत ५१ बळी गेले आहेत. मात्र, लोकांना सध्या कोरोनाचा विसर पडला असून फोंडा शहरातील बाजारपेठ व मासळी मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी पाहिली, तर दिवाळीनंतर कोरोनाचा उद्रेक पुन्हा होईल की काय, अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा :  राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना अजून नाहिसा झालेला नाही. फोंड्यात कोरोनाचे आतापर्यंत ५१ बळी गेले आहेत. मात्र, लोकांना सध्या कोरोनाचा विसर पडला असून फोंडा शहरातील बाजारपेठ व मासळी मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी पाहिली, तर दिवाळीनंतर कोरोनाचा उद्रेक पुन्हा होईल की काय, अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा पालिका क्षेत्रातील बसस्थानक, बुधवारपेठ मार्केट तसेच मासळी मार्केटमध्ये कुणाचेही नियंत्रण नसल्याने मास्क केवळ नावापुरते चेहऱ्यावर चढवले जातात आणि प्रत्यक्ष खरेदीवेळी हनुवटीवर ठेवून बिनधास्त ग्राहक आणि विक्रेते व्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस आणि फोंडा पालिकेने आवश्‍यक ती खबरदारी घेण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. 
फोंड्यातील बसस्थानक, वरचा बाजार भागातील बुधवारपेठ मार्केट, मासळी मार्केटमध्ये आठवड्याच्या बाजाराला तसेच मासळी खरेदी करण्यासाठी सकाळच्या वेळेला ग्राहकांची झुंबड उडते. दिवाळीला एवढे दिवस बाजारात गर्दी नव्हती पण दिवाळीच्या पूर्वसंध्येला मात्र बाजार भागात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीवर कुणाचे नियंत्रण नव्हते. फक्त वाहतूक व्यवस्था तेवढी चोख ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस मात्र परिश्रम घेताना दिसले. 

फोंड्यात कोरोनाचे आतापर्यंत पाचहजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण बरेही झाले आहेत, मात्र कालपर्यंत बळींचा आकडा एकावन्नवर पोचला होता. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत असले तरी कधीही रुग्णसंख्या वाढीचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्‍यकता असताना मास्क नसलेले लोक बिनधास्तपणे बाजार भाग तसेच बसस्थानक परिसरात वावरताना दिसत आहेत. या बेफिकिर लोकांना अडवण्याचे धाडस कुणी दाखवत नाही. मास्क न वापरणाऱ्यांना दंड करण्याची तरतूद प्रशासकीय पातळीवर करण्यात आली असली तरी सध्या हा कायदा बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. 

फोंडा बसस्थानकावर सकाळी, दुपारी व संध्याकाळच्या वेळेला बसगाड्या "ओव्हरफ्लो'' होताना दिसत आहेत. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला बसमधून घरी परतणारे प्रवासी गर्दी करीत असल्याने कोरोनाचा धोका संभवत आहे. मात्र कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने लोकांनी मनातून भीती काढून टाकली आहे, तरीपण लोकांचे बळी जात असल्याने हा धोका टळलेला नाही. त्यामुळे बेफिकिरपणे वागणाऱ्या या लोकांवर फोंडा पोलिस तसेच पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

फोंड्यातील गर्दीची ठिकाणे...
फोंड्यातील वरचा बाजार भागातील बुधवारपेठ मार्केट तसेच आठवडी बाजार आणि मासळी मार्केटमध्ये सर्वात जास्त गर्दी होते. मासळी मार्केटमध्ये तर ग्राहक आणि विक्रेते बेफिकिरपणे वावरताना दिसतात. मासे खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने लोकांना जीव प्यारा नाही, तर मासे जास्त प्रिय असल्याचे दृष्टीस पडते. बसस्थानक भागात सकाळी व संध्याकाळच्या वेळेला गर्दी होते. बसमधून घर गाठण्यासाठी विशेषतः संध्याकाळच्या वेळेला लोक गर्दी करीत असतात.

फोंड्यात अर्धशतकी बळी...
फोंडा तालुक्‍यात आतापर्यंत कोरोना बळीने अर्धशतक पार केले आहे. फोंड्यातील बळींचा आकडा ५१ झाला असल्याची माहिती फोंड्याच्या कोविड विभागाचे प्रमुख असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोरोना बळीत फोंड्यातील चार वकिलांसह इतर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कोरोना बळीत पन्नास ते ऐशीच्या वयोगटातील लोकांचा जास्त भरणा असून खांडेपार येथे तर आई आणि मुलाचा मृत्यू होण्याचा तर फोंडा शहर परिसरात एक महिन्याच्या तान्हुल्याचा दुर्दैवी मृत्यू होण्याचा प्रसंगही ओढवला आहे. 

चतुर्थीनंतर दिवाळालाही....
मागच्या काळात फोंड्यात चतुर्थीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढली होती. आता दिवाळीलाही बेफिकिरी वृत्ती निदर्शनास आल्याने चतुर्थीप्रमाणे दिवाळीनंतरही कोरोनाचे रुग्ण वाढणार की काय, अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागले नाही, अन्यथा कोरोनाचे संक्रमण विदेशाप्रमाणे गोव्यातही वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

"कोरोनाची भीती मनातून काढून टाकली असली तरी खबरदारी ही महत्त्वाची आहे. तरीपण लोक मास्क वापरत नाही, सामाजिक अंतर राखत नाही, त्यामुळे अशा लोकांवर कारवाई ही अपेक्षित आहे."
- जयराज रामा गावकर

"कोरोना संपला नसला तरी लोक मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे आता हिंवाळा असल्याने कोरोना रुग्णसंध्या वाढण्याची भीती आहे. लोकांनी आताच सावध होण्याची गरज आहे."
- प्रकाश नारायण नाईक 

फोंडा शहरात बेफिकीर वागणाऱ्यांवर हवी कारवाई
कोरोनाचे संक्रमण संपलेले नाही. फक्त रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र फोंडा शहर परिसरात बेफिकिरपणे वागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोना संपला असल्याचे गृहित धरून काही विक्रेते तर ग्राहक चेहऱ्यावर मास्क न लावताच व्यवहार करतात. कानाला मास्कच्या दोऱ्या असतात, मात्र मास्क हनुवटीखाली असतो. त्यामुळे मास्क लावून त्याचा काय उपयोग असा सवाल वैद्यकीय क्षेत्रातील लोक विचारताना दिसतात. फोंडा बसस्थानक तसेच बाजार व मासळी मार्केटमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कडक दंड करण्यासाठी फोंडा पोलिस तसेच पालिका प्रशासनाने कारवाई सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
 

संबंधित बातम्या