फोंड्यात पोलिसांसह एकूण रुग्णसंख्या ४०

Shantadurga tempale
Shantadurga tempale

फोंडा

संपूर्ण फोंड्यात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला असून सरकारने आवश्‍यक खबरदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
राज्यात इतर ठिकाणी कोरोना रुग्ण सापडत असताना फोंडा तालुक्‍यात मात्र किरकोळ स्वरूपात काही मोजक्‍याच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र, गेल्या आठवड्यात फोंडा पोलिस स्थानकच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले असून फोंडा पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय व इतर नागरिकांत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
फोंड्यातील पोलिस ज्या ठिकाणी राहतात, त्या गावात तसेच इतर संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे. फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळात कोरोना चाचणी सुरूच असून गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांनी चाळीशी गाठली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या फोंडा, उसगाव, पिळये - धारबांदोडा, मोले, कुर्टी, खांडेपार, म्हार्दोळ, कुंडई, माशेल, बोरी, शिरोडा, आडपई तसेच इतर पंचायत क्षेत्राचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपापली चाचणी करून घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
फोंडा पोलिस स्थानकाबरोबरच फोंडा आयडी इस्पितळातील सर्वांची कोरोना चाचणी करण्याची मागणी समोर येत आहे. वैद्यकीय सेवेशी निगडित काहीजणांनी कोरोनाबाबत भीती व्यक्त केली असून तपासणी केल्यास आकडा वाढण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभर आरोग्य खात्याशी संबंधितांनाही कोरोना लागण झाल्याची चर्चा फोंडा परिसरात करण्यात येत होती.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वाहनचालकांना ‘तालांव’ दिला आहे. त्यामुळे संसर्गाची लागण या वाहनचालकांना होण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे.
गोवा बागायतदारमध्ये प्रवेश निर्बंध!
फोंड्यातील गोवा बागायतदारमध्ये तसेच इतर ठिकाणच्या बागायतदार बाझारमध्ये सोमवारी ६ तारखेपासून ग्राहकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी ते शनिवारी सकाळी साडेआठ ते दुपारी एक व दुपारी अडिच ते संध्याकाळी सहापर्यंत बाजार सुरू राहील. ग्राहकांच्या मागणीवरून त्यांनी सादर केलेल्या यादीनुसार माल काढून दिला जाईल. याशिवाय ग्राहकांनी मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक असल्याचे गोवा बागायतदारच्या प्रशासनाने म्हटले आहे.
कवळे शांतादुर्गा देवालय आज, तर
बांदोडा महालक्ष्मी मंदिर उद्या होणार खुले

फोंडा तालुक्‍यातील काही मोठी देवालये कोरोनामुळे बंदच ठेवण्यात आली होती. यासंबंधी झालेल्या बैठकीत कवळे येथील शांतादुर्गा देवालय आज (६ रोजी), तर बांदोडा येथील महालक्ष्मी देवालय उद्या (७ रोजी) खुले करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. ही देवस्थाने देवदर्शनासाठी भाविकांना खुली करण्यात येत असली, तरी कोरोनासंबंधीच्या सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा पूर्णपणे अवलंब केला जाईल, असे देवस्थानच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन व इतर सूचनांचा अवलंब भाविकांना करावा लागेल. दरम्यान, मंगेशी येथील मंगेश देवस्थान येत्या १९ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील निर्णय येत्या १२ रोजीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

फोंड्यात उशिरापर्यंत दुकाने खुली!
फोंडा शहर तसेच लगतच्या कुर्टी व ढवळी भागात रात्री उशिरापर्यंत काही दुकाने खुली ठेवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. खास करून फास्ट फूडवाले रात्री उशिरापर्यंत दुकाने खुली ठेवत आहेत. दोन दिवसांपूर्वी फोंड्यातील एका फास्ट फूडवाल्याला फोंडा पोलिसांनी तंबी दिली होती, त्यावेळेला या फास्ट फूडवाल्याने लगेच दुकान बंद केले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून येरे माझ्या मागल्या असा प्रकार आहे. एका बाजूला कोरोना रुग्ण वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला बेपर्वाईचे प्रदर्शन होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com