ओसाड जागेत स्वावलंबी आत्मनिर्भरतेचा ‘मंत्र’

पद्माकर केळकर
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

नानेली गावात दत्तगुरू वझेंची किमया, खनिज कंपनी ते बागायतदार असा कणखर प्रवास

वाळपई:  शेती, बागायतीचे चोख व योग्य व्यवस्थापन केल्यास नक्कीच बागायती ही चांगली होणारी आहे. बागायतदारांना अनेक वेळा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे, जंगली जनावरांचा उच्छाद या गोष्टी शेतकरी वर्गाला नकोसे करून सद्यःस्थिती टाकत आहे. तरी देखील सत्तरी तालुक्यातील बागायतदारांनी आपली बागायत मेहनतीने टिकवून ठेवली आहे. असेच एक कष्टकरी बागायतदार आंबेडे सत्तरी येथील  दत्तगुरू रामचंद्र वझे यांचे नाव परिचयाचे बनले आहे.

नम्रपणा, प्रामाणिकपणा असे हे व्यक्तीमत्व आहे. त्याकाळी आंबेडे सत्तरी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी आंबेडे येथे सरकारी शाळेत घेतले. आंबेडे गावात त्याकाळी पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते गोव्यात इतरत्र गेले. गोव्यात प्रमुख खनिज खाण उद्योग असल्याने खनिज क्षेत्रात शिक्षण घेण्याचे ठरविले व सरकारी तंत्र निकेतन येथे १९८० साली खाण अभियंता दत्तगुरूंनी पूर्ण केली. त्यानंतर गोव्यात चौगुले व फोमेंतो खाण कंपनीत काम केले. या कंपनीत अनेक पदे सांभाळत गोवा व महाराष्ट्र येथे ३६ वर्षे खाण  क्षेत्रात काम केले. दोन वर्षे इराकला बांधकाम क्षेत्रातही काम केले. दोन वर्षा पूर्वी जनरल मॅनेजर म्हणून ते  निवृत्त झाले आहेत. तसा बागायती हा पारंपरिक व्यवसाय. 

नानेली सत्तरी येथे वझेंचे मालकीचे फार्म पूर्ण ओसाड होते. त्यासाठी स्वत: मेहनत घेऊन जमीन लागवडी खाली आणली.  संपूर्ण जागेभोवती पक्के कुंपण घातले. कामगारांना व स्वत:ला राहायची सोय करुन विहीर व बंधारा बांधून पाण्याची सोय केली. शेतात जायला व्यवस्थित रस्ता नव्हता तो केला. ओढ्यावर पूल बांधून घेतला व नवीन लाइन टाकून विजेची सोय केली. संपूर्ण जागेसाठी सिंचनाची सोय केली. सन 1992 पासून या कामाची सुरुवात केली होती. निवृत्ती नंतर त्याकडे पूर्ण लक्ष देण्याचे ठरविले होते. व त्यानूसार आता ते काम करीत आहे. काजू बागायतीत असलेली काजूची जुनी लागवड पूर्णपणे काढून नवीन  वेंगुर्ला -4, वेंगुर्ला-7, तिसवाडी, जी .बी 2, भास्कर इत्यादी जाती पद्धतशीरपणे योग्य अंतरावर लागवड केली. याबाबत दत्तगुरू वझे यांनी सांगितले की काजू लागवड करायची असल्यास जुन्या काजू लागवडीमध्ये नवीन झाडे व्यवस्थित वाढत नाहीत हा आपला अनुभव आहे. म्हणून नवीन लागवड करताना ती काळजी घेतली आहे. सर्व झाडांना ठिबक सिंचंनाची सोय केली. काही ठिकाणी आवळा पिकाची कलमे होती. त्यात भर घातली. आंबा, नारळ आधी होते त्यात सुद्धा भर घातली. बरीच वर्षे व्यवस्थापनाचे काम केल्याने सुरूवातीला बराच त्रास जाणवला. पण त्यावर मात करण्याचे पक्के केले व जोमाने कामाला सुरुवात केली.

बागायतीतून मिळणाऱ्या आवळा फळापासून आवळा कँन्डी व आवळा सिरप बनविले. विक्रीसाठी गोवा बागायतदार संस्थेची मोलाची साथ मिळत आहे. 

गोवा बागायतदार संस्थेच्या सर्व शाखा आवळा कँन्डी उपलब्ध आहे. भविष्यात पुढे जावून बागायती माला पासून  इतर उत्पादने बनविण्याची इच्छा आहे. यंदा पासून भेंडी व चिटकी भाजी लागवडीला सुरुवात केली आहे. दर दिवशी भेंडीचे १० किलो उत्पादन घेतले आहे. ती भाजी वाळपई येथील भाजी विक्रेत्याकडे विकत आहे.  शेतकऱ्याला खरोखर आत्मनिर्भर बनायचे असेल तर माझ्या मते अनुदानपेक्षा सुद्धा त्याच्या मालाला योग्य मागणी व योग्य मोबदला कसा मिळेल. हे पाहणे जास्त उचीत ठरेल व शेतकऱ्याचा आत्मसन्मान पण वाढेल, असेही ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या