गोव्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार योग्य दिशा

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

गोव्यातील पर्यटन व्यवसायाला योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी सरकारने यावर श्‍वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी ‘गोवन्स फॉर दाबोलीम ओन्ली’चे (जीएफडीओ) अध्यक्ष  एरिमितो रिबेलो यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

सासष्टी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गोव्याची आर्थिक स्थिती बिकट बनली असून पर्यटन व्यवसायाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. गोव्यातील पर्यटन व्यवसायाला योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी सरकारने यावर श्‍वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी ‘गोवन्स फॉर दाबोलीम ओन्ली’चे (जीएफडीओ) अध्यक्ष  एरिमितो रिबेलो यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

गोव्याचा आर्थिक कणा म्हणून पाहण्यात येणारा पर्यटन व्यवसाय सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे धोक्यात आलेला आहे. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक बनलेले असून सरकारने यावर लक्ष केंद्रीत करून श्‍वेतपत्रिका तयार करणे गरजेचे आहे, असे एरिमितो रिबेलो यांनी सांगितले. तसेच दाबोळी व मोप विमानतळ कशाप्रकारे चालणार हेही सरकारने श्‍वेतपत्रिकेमध्ये स्पष्ट करावे, असेही त्यांनी सांगितले. 

मंगळुरूसारख्या शहरात विमानतळाचे खासगीकरण करण्यात आलेले असून दाबोळी विमानतळावर कमतरता भासत असल्यामुळे उभारण्यात येणाऱ्या मोप विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर मोप विमानतळाचेही खासगीकरण करण्यात येणार का हे सरकारने गोमंतकीयांना स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे एरिमितो रिबेलो यांनी सांगितले. 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाबोळी विमानतळ विकसित व विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून दाबोळी विमानतळ विकसित झाल्यावर या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या निश्चितच वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या