
CM Pramod Sawant पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यांनी गोव्यात येण्यापूर्वी सोशल मीडियावरील दिसणारी ‘मोकळीक’ आणि प्रत्यक्षात येथे परिस्थितीनुसार लागू करण्यात आलेले नियम यांची माहिती घ्यावी.
पर्यटकांनी राज्यातील नियमांचे पालन करावेत. कायदा हातात घेऊन झालेल्या प्रकरणाची चुकीची माहिती व्हिडिओ काढून ते व्हायरल करून गोव्याची बदनामी करू नये, त्यांनी मदतीसाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दिल्ली पर्यटकांवरील हल्ल्याबाबत झालेल्या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला आहे. पर्यटकांसाठी गोवा हे सुरक्षित असून पर्यटकांशी गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगण्याची पाळी मुख्यमंत्र्यांवर आली. हे प्रकरण गोव्यातील पर्यटनाला घातक असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीने गृह, मजूर व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक घ्यावी लागली.
बैठकीनंतर ते म्हणाले, गोव्यात येणारे पर्यटक हे ‘अतिथी देव भव’ आहेत. त्यामुळे पर्यटकांची कोणतीही सतावणूक होणार नाही, यासाठी सरकारी यंत्रणेचे त्याकडे लक्ष असेल. अनेकदा चुका या पर्यटकांकडून वा पर्यटन व्यावसायिकांकडूनही होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कायदा हातात न घेता संबंधित तक्रारी पोलिसांकडे दाखल कराव्यात. जर कारवाई होत नसेल तर त्यांनी थेट पोलिस महासंचालकांकडे किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय
राज्यात यापूर्वी पर्यटन खात्याकडे सुमारे 1200 हॉटेलांची नोंदणी केली होती. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या हॉटेल चालकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची केल्यानंतर व कारवाई सुरू केल्यानंतर सुमारे 6 हजार हॉटेलांची नोंदणी झाली आहे.
यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे व्यवसाय केला जात होता, हे उघड होते. परप्रांतीय मजुरांची नोंदणी कामगार खात्याकडे करणे सक्तीचे आहे. या कामगारांकडे खात्याकडून दिलेले जाणारे ओळखपत्र असायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
परीक्षेवेळी रात्री 10 नंतर संगीत बंद
कायदेशीर पर्यटन व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी सरकार नेहमीच सहकार्य करील. पर्यटन, कामगार व गृह खात्यातर्फेही त्यांना मदत केली जाईल. मात्र, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मात्र सरकार कठोर कारवाई करताना राजकीय तसेच इतर कोणताही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.
राज्यात रात्री 10 वाजल्यानंतर खुल्या जागेत संगीत वाजवण्यास बंदी आहे. 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात हॉटेल व्यावसायिकांनी रात्री 10 वाजल्यानंतर संगीत बंद ठेवण्यात यावे. या काळात पोलिसांकडून गस्त ठेवली जाणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.