राजधानी पणजीत धावणार आता चोवीस तास ‘टोईंग’ गाडी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

राजधानी पणजीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेने आणलेली ‘टोईंग’ गाडी आता चोवीस तास धावणार आहे. पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी हे वाहन सध्या कार्यरत झाले आहे.

पणजी राजधानी पणजीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेने आणलेली ‘टोईंग’ गाडी आता चोवीस तास धावणार आहे. पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी हे वाहन सध्या कार्यरत झाले आहे. महापालिकेच्या या सेवेसाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेचे दहा पोलिस मदत करणार आहेत. आज सकाळी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
या बैठकीस महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स व वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीविषयी माहिती देताना महापौर मडकईकर म्हणाले की १९ तारखेपासून आम्ही प्रभाग क्रमांक २८ मधील रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईत करीत आहोत. माजी महापौर विठ्ठल चोपडेकर यांचा हा प्रभाग असून, गेली चार दिवसांपूर्वी त्यांच्याकडे येथील नागरिक रस्त्यावर उभ्या केल्या जात असलेल्या वाहनांबाबत तक्रारी करीत होत्या. काही नागरिकांनी आपल्याकडेही तक्रारी केल्या, त्यानुसार आम्ही चारदिवसांपूर्वी वाहनांना क्लॅम्प लावण्यास सुरुवात केली. दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाईत केली. यासाठी चोपडेकर यांनाही लोकांच्या तक्रारी आल्याने रात्री-अपरात्री उठावे लागले आहे. 

ते पुढे म्हणाले की, महापालिकेने वाहने उचलून आणण्यासाठी घेतलेल्या टोईंग वाहनांद्वारे ही कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली असून, सुटीच्या दिवशीही ही चोवीस तास कारवाई सुरू राहणार आहे. शहरातून हे वाहन फिरणार असून, पार्किंगचे नियम मोडणाऱ्या दुचाक्या उचलून आणल्या जाणार आहेत. वाहतूक शाखेचे दहा पोलिस यासाठी दिले जाणार असून, पाच पोलिस सकाळच्या सत्रात, तर पाच रात्रीच्या सत्रात काम करतील.

संबंधित बातम्या