कृषी विधेयकाविरुद्ध म्हापशात ट्रॅक्टर रॅली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने रविवारी डिचोली ते म्हापसापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.  या कायद्यांमुळे शेतकाऱ्यांचे केवळ नुकसानच होईल, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिराच्या आवारात या आंदोलनाचा समारोप झाला. 

म्हापसा: कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने रविवारी डिचोली ते म्हापसापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारण कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी तीन नवीन विधेयके आहेत. या कायद्यांमुळे शेतकाऱ्यांचे केवळ नुकसानच होईल, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिराच्या आवारात या आंदोलनाचा समारोप झाला. 

मुळात केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकार हे केवळ पोलिस बळाचा वापर करून काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आजही सावंत सरकारने प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. 
या कृतीचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला. 

उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले, की काँग्रेस नेहमीच गोरगरिबांची साथ देत आला आहे. मात्र, भाजपने आजवर केवळ उद्योगपतींना पाठिशी घातले. आज काँग्रेसने शांतीपूर्वक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी काँग्रेसने आठवड्यापूर्वी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, शेवटच्या क्षणी कोणतीही पूर्वकल्पना न देताच, प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून आंदोलन बंद पाडण्याचे षडयंत्र रचले. यातून भाजपच्या नैतिकतेचे दर्शन घडते.

काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले, की भाजपने नेहमीच लोकशाहीचा अपमान केला असून ही तीन विधेयके देखील त्याच पद्धतीने दोन्ही सभागृहातून मंजूर करून घेतली आहेत.

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संकल्प आमोणकर, विजय भिके, वरद म्हार्दोळकर, अभिजीत देसाई, विठू मोरजकर, सुधीर कांदोळकर, मेघश्याम राऊत, भोलानाथ घाडी, चंदन मांद्रेकर, राजन घाटे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या