काणकोण तालुक्यात पायहोडा या पारंपरिक पद्धतीने मासेमारी

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

काणकोणात पाळोळे, आगोंद, तळपण गालजीबाग या किनाऱ्यावर पायहोडा या पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू झाली आहे.

काणकोण: काणकोणात पाळोळे, आगोंद, तळपण गालजीबाग या किनाऱ्यावर पायहोडा या पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू झाली आहे. यंदा कोळंबीच्या पैदासीच्या काळात वादळी पाऊस झाल्याने मासेमारीत सोन्याची अंडी देणारी कोळंबीच्या मासेमारीला येथील मच्छीमारांना मुकावे लागले. गेली दोन वर्षे येथील मच्छीमारांना कोळंबी मासेमारीला मुकावे लागत आहे.

काणकोणात नारळी पौर्णिमा झाल्‍यानंतर मासेमारीला सुरवात करण्यात येते. पाळोळे हा सुरक्षित किनारा असल्याने येथे जुलै महिन्यांतच पायहोडा या पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यात येते. मात्र, यंदा  वादळी पावसामुळे या मासेमारीवर बंधने आली. गणेश चतुर्थीपासून पावसाने उसंत घेतल्याने मासेमारीला तेजी आली आहे. 

मासळीचे भाव चढेच राहिले आहेत. शंभर रुपयांना मिळणारा करमटचा वाटा आता दोनशे रुपयांना विकण्यात येत आहे. काणकोणात मत्स्योद्योग खात्याचे अनुदान घेऊन बांधलेल्या शंभरपेक्षा जास्त मोटार बोटी आहेत. जाळी खरेदीसाठीही अनुदान मिळत आहे. आता राहिला प्रश्न बोटीवर काम करणाऱ्या कामगारांचा.

बोट मालकांना मासेमारीसाठी परराज्यातील कामगारावर अवलंबून राहावे लागत आहे. खलाशी, तांडेल, सुकाणूधारक हे सर्वच परगावचे असल्याने त्यांच्या वेतनाचा खर्च व मिळकत यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे एक बोट मालक सायमन रिबेलो यांनी सांगितले. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने बोटीचा ऑपरेशनल खर्च वाढला आहे. आता सीमा खुल्या झाल्याने आंध्रप्रदेश व अन्य राज्यांतील बोटीवर काम करणारे कामगार सहजपणे राज्यात येऊ शकणार आहेत. यापूर्वी त्यांना परराज्यातून आणल्यानंतर स्वॅब तपासणीसाठी प्रत्येकी दोन हजार रूपये शुल्क सरकारी तिजोरीत जमा करावे लागत असे. त्यानंतर त्यांना चौदा दिवस विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये खर्च येत होता. आता सीमा खुल्या झाल्याने त्या खर्चाला कात्री लागून मासेमारी व्यवसाय करणाऱ्याना दिलासा मिळाल्याचे रिबेलो यांनी सांगितले.

संबंधित बातम्या