Goa: करासवाडा जंक्शनवर चालकांची कसरत
Goa: Traffic Jam In Karaswada.Dainik Gomantak

Goa: करासवाडा जंक्शनवर चालकांची कसरत

Goa: अपघातांत वाढ : उड्डाणपुलाच्या कंत्राटदाराला दिलेली मुदतही उलटली

म्हापसा : करासवाडा (Karaswada, Mapusa-Goa) येथील राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शनच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जणू तारेवरची कसरत करून वाहने हाकावी लागतात. त्यामुळे लहानसहान अपघातही त्या ठिकाणी कित्येकदा होत असतात.

उड्डाणपूल २६ ऑगस्टपासून खुला करण्यात येईल, असे कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने उपजिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. तथापि, ती तारीख उलटून गेली तरी काम पूर्ण झालेले नाही. तेथील कामाची सध्याची गती पाहता तो उड्डाणपूल खुला व्हायला आणखी किमान दहा-पंधरा दिवस जातील, अशी शक्‍यता आहे.

सध्या तेथील उड्डाणपुलाच्या कामामुळे ही एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या जंक्शनवर एका बाजूने अस्नोडा, पीर्ण, डिचोली, वाळपई इत्यादी भागांतून, तर दुसऱ्या बाजूने कोलवाळ, रेवोडा, पेडणे, पत्रादेवी इत्यादी भागांतून येणारी वाहने एकत्रित होत असतात. तेथील अरुंद तथा अडथळ्यांनी युक्त रस्त्यावरून वाहने हाकणे कठीण होत असते. हे जंक्शन पार करणे म्हणजे वाहनचालकांच्या दृष्टीने एकादृष्‍टीने मोठे दिव्यच असते. कारण वाहनांची संख्या प्रचंड असते. दुसरे म्हणजे ओबडधोबड असलेल्या अरुंद रस्त्यांमुळे तेथून वाहन चालवणे अवघड बनले आहे. हे अडथळे पार करून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागते. उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने त्या रस्त्यासंदर्भात गेल्या कित्येक महिन्यांपासून सोयच केलेली नाही, असे जाणवते.

Goa: Traffic Jam In Karaswada.
Goa Plan: पर्यटकांसाठी गोव्याच्या वाटा खुल्या

सुमारे दीड महिन्यापूर्वी शिवसेनेचे नेते जितेश कामत यांनी आपल्‍या सहकाऱ्यांसमवेत या समस्येसंदर्भात निदर्शने केली होती. त्या वेळी कंत्राटदाराच्‍या प्रतिनिधीने (पीआरओ) तिथे उपस्थित राहून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे तसेच त्या भागात सर्वत्र सूचनाफलक उभारण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले होते. तथापि, त्याबाबतदेखील दीर्घ काळ कार्यवाही झालेली नव्हती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी तिथे सूचनाफलक उभारण्यात आले आहेत.

चारही बाजूंनी वाहने येत असल्याने या जंक्शनवर वाहनांची मोठी गर्दी होत असते. ते जंक्शन पार करताना वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय होत असतो. विशेषतः सकाळच्या वेळी व सायंकाळच्या वेळी नोकरी-व्‍यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ही समस्या प्रकर्षाने भेडसावत असते. अशा परिस्थितीत काही वाहनचालक वाहन मधेच घुसवत असल्याने या समस्येत अधिकच भर पडते. तिथे वाहतूक पोलिस अपवादानेच दिसून येतो. वाहतूक पोलिसाची तिथे कायमस्‍वरूपी व्यवस्था केली तर ही समस्या थोडीफार आटोक्यात येईल, असे वाहनचालकांचे म्‍हणणे आहे.

खड्डे काँक्रीटच्या साहाय्याने बुजवणे आवश्यक

रस्त्यावर पडलेले खड्डे काँक्रीट घालून बुजवणे तसेच तिथे दिवसरात्र वाहतूक पोलिसाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. सरकारने कंत्राटदाराला ताकीद देऊन येत्या गणेश चतुर्थीपूर्वी येथील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्‍या रस्त्यावरची चिखलमिश्रित माती काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत, अशी वाहनचालकांची मागणी आहे. वाहनचालकांना होणारा त्रास तेव्हाच कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

या समस्येसंदर्भात शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर त्या भागात कंत्राटदाराने मोठमोठ्या आकाराचे सूचना फलक रिफ्लेक्टरसह उभारले आहेत. पण, त्याबाबत खूपच दिरंगाई झाली. उड्डाणपुलाचे काम लवकर होण्याची शक्यता सध्या दिसतच नाही. त्यामुळे ही समस्या बराच काळ कायम राहील, असे वाटते.

- जितेश कामत, गोवा राज्यप्रमुख, शिवसेना

Goa: Traffic Jam In Karaswada.
Goa: मुरगाव पालिकेतर्फे देस्तेरो उड्डाणपुलाखालील घरे पाडण्याचा आदेश

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com