Goa Traffic: पणजीचा ‘श्‍‍वास’ कोंडला!

दिवसभर वाहतूक कोंडी : ‘अटल सेतू’ बंदचा परिणाम; सरकारप्रति संताप
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak

राजधानी पणजीत ठिकठिकाणी सुरू असलेली ‘स्मार्ट सिटी’ची कामे, जी-20 परिषदेच्‍या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांचे सुरू असलेले डांबरीकरण व पुढील 27 मार्चपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला ‘अटल सेतू’ यामुळे आज दिवसभर मांडवी पुलांच्या दोन्ही बाजूने तसेच पणजीतील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला.

पर्वरी ते पणजीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्‍या. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना दिवसभर कसरत करावी लागली.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यामुळे सर्व कामे एकाच वेळी सुरू आहेत. त्‍यामुळे वाहतुकीच्‍या कोंडीत आणखी भर पडत आहे.

आज आठवड्याचा कामावर येण्याचा पहिलाच दिवस (सोमवार) होता. त्‍यामुळे सकाळीच पणजी जाम झाली. अनेक कर्मचारी कार्यालयांत उशिरा पोचले.

‘अटल सेतू’वरील रस्‍त्‍याचे काम सुरू केले आहे. त्‍यामुळे हा पूल येत्या 27 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मात्र वाहतुकीची कोंडी टाळण्‍यासाठी नियोजन न करण्‍यात आल्‍याने वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागला.

मडगाव व फोंड्याहून पर्वरीकडे जाणारी वाहने मांडवी पुलावरून वळविण्यात आली. त्यामुळे या दोन्ही पुलांवर वाहनांच्‍या मोठ्या रांगा लागल्या. पर्वरीत असलेल्या सिग्नलमुळे वाहनांची रांग पुलापर्यंत पोचली होती.

अवजड वाहतूक दिवसा बंद करा

राज्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. ‘अटल सेतू’ बंद करण्यात आल्यामुळे सर्व अवजड वाहनांची वाहतूक नव्या मांडवी पुलावरून होत असल्याने या कोंडीत आणखी भर पडत आहे.

त्यामुळे अवजड वाहतूक दिवसाची बंद ठेवण्यात यावी व त्‍यास रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीस परवानगी द्यावी. त्यामुळे दिवसा या कोंडीवर नियंत्रण येईल. अवजड वाहनांमुळे नव्या मांडवी पुलावर अधिक ताण येऊ शकतो, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

Goa Traffic
Indian Super League: एफसी गोवाची ग्रासरुट फुटबॉलमध्ये छाप

दक्षिणेतून अतिरिक्त पोलिस

पणजी वाहतूक पोलिस कक्षात मनुष्यबळाची कमतरता आहे. आज झालेल्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असले तरी, ते खूपच कमी आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातून अतिरिक्त पोलिस कर्मचारी पणजीत आणण्यात आले आहेत.

शिवाय पोलिस खात्याकडे असलेल्या गृहरक्षकांचीही सेवा घेतली जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरोधात कारवाई तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे अशी दुहेरी कामे करताना पोलिसांची ओढाताण होत आहे. त्‍यातच त्‍यांच्‍यावर वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणे नोंद करण्याचे दडपण असते.

Goa Traffic
Anthony Rebello Passed Away: माजी फुटबॉलपटू अँथनी रिबेलो यांचे निधन

‘अटल सेतू’वरील रस्‍ताकामाच्या ठिकाणी तसेच पणजी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खोदकामांच्या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वाहतूक मार्शल’ नेमण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची असते.

मात्र ती पार पाडली जात नाही. वाहतूक मार्शल प्रत्येक कामाच्या ठिकाणी तैनात करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या कंत्राटदारांना त्वरित देण्याची गरज आहे. त्यांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये वाहतूक मार्शलवर होणाऱ्या खर्चाचाही समावेश असतो.

- बोसुएट सिल्वा, वाहतूक पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com