पेडणे शहरात वाहतुकीची कोंडी

नागरिकांकडून नाराजी: नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिस अपयशी
पेडणे शहरात वाहतुकीची कोंडी
Traffic jam Dainik Gomantak

मोरजी: पेडणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेडणे शहरात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र काही वाहतूक पोलिस राष्ट्रीय महामार्ग 66 च्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून दंडात्मक कारवाई करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनचालक मिळेल त्या जागी आपापली वाहने उभी करतात. सरकारने वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन पेडणे शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पेडणे बसस्थानकाच्या प्रकल्पात भूमिगत पार्किंगची व्यवस्था केली आहे. या पार्किंगचे कंत्राट व्यावसायिकाने घेतले असून, वाहन पार्किंगचा दर जास्त लावला जात असल्याने वाहन चालक त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था असूनही वाहने उभी करत नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनेच वाहने दिसून येत आहेत.

Traffic jam
सांगे तालुक्यात नारळ लागवडीमुळे ऊस पीक धोक्यात

तत्कालीन सरकारने 33 कोटींहून अधिक खर्च करून पेडणे बसस्थानक उभारले. मात्र अर्धवट स्थितीत असतानाच या बसस्थानकाचे उद्‌घाटन तत्कालीन सरकारने 2017 च्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून घाई गडबडीत केले. हे बसस्थानक खुले झाले तर आपोआप वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पार्किंग जागेसाठी भरमसाट दर

एका वाहतूक अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले, पार्किंग जागेसाठी भरमसाट दर आकारले जात असल्याने वाहनचालक त्याठिकाणी वाहने लावत नाहीत. रस्त्यांवर मिळेल त्या जागी वाहने उभी करून लोक आपापल्या कामाला जातात. सरकारने हा दर कमी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Traffic jam
‘नेत्रावळी’कडे पर्यटकांनी फिरवली पाठ

अरुंद रस्त्यांमुळे भर

पेडणे शहरात अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पर्यायाने आठवड्याच्या बाजारादिवशी या कोंडीत भर पडते. वाहतूक पोलिस जरी तैनात असले तरी काही वाहनचालक त्यांना अरेरावीची भाषा करतात. सरकारने या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक प्रशांत गडेकर यांनी केली.

अधिकारी चलन देण्यात मग्न

वाहतूक खाते हाकेच्या अंतरावर बसस्थानकात आहे. अधिकारी मात्र रस्त्यावर आपले वाहन उभे करून जे नियम मोडतात त्यांना चलन देण्यात मग्न असतात. तसेच वाहतूक पोलिसही अडगळीत रस्त्यावर उभे राहून आपल्याला पाहिजे त्या वाहनाला अडवून चलन की परस्पर कारवाई करताना दिसत आहेत, त्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.