कृषी पदवीधर देतेय माडावर चढण्‍याचे प्रशिक्षण

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक संस्‍थांना व विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी जाहीर केली आहे. या सुटीचा सदुपयोग चांगल्‍या कामासाठी व्‍हावा, या उद्देशाने सुळकर्णा येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका राऊत ही विद्यार्थ्यांना माडावर चढण्‍याचे व नारळ काढण्‍याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहे.

सासष्टी

 कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक संस्‍थांना व विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी जाहीर केली आहे. या सुटीचा सदुपयोग चांगल्‍या कामासाठी व्‍हावा, या उद्देशाने सुळकर्णा येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका राऊत ही विद्यार्थ्यांना माडावर चढण्‍याचे व नारळ काढण्‍याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहे.
सुळकर्णा येथील नानू फार्ममध्ये शेतीत होत असलेले बदल, पिक पद्धत, आधुनिक साधनांचा वापर, खत खाद्य या सर्व गोष्टींचे तिने प्रशिक्षण घेतले आहे. कृषीसंबंधित ज्ञान हे वर्गाचा चार चौकटीत मिळू शकते. पण, कृषीचा अनुभव वर्गात मिळू शकत नाही. तो अनुभव प्रशिक्षण देताना मिळत आहे, असे कृतिका राऊत यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी देण्यात आल्यामुळे या काळात अनेक विद्यार्थी विविध उपक्रम राबवित आहेत. सुळकर्णा येथील कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या कृतिका राऊत हिने नानू फार्ममध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. कृतिकाने आपला प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला असून आता ती याच फार्ममध्ये इतरांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. कृषी क्षेत्रात आवड असल्यामुळे कृतिका हिने कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, तर कृषी क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याचा दृष्टीने ती काम करीत आहे.

सुळकर्णा येथील नानू फार्ममध्ये हायब्रिड बियाणांची निर्मिती, लागवड प्रक्रिया, शेतीत होणारे बदल, पिक पद्धत, आधुनिक साधनांचा वापर, खत खाद्य, मार्केटिंग आदींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे शाळेला सुटी देण्यात आल्यामुळे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येत आहेत. कृषी क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात आधुनिकतेचा वापर करण्यात येत असून कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक बदल फायदेशीर ठरत आहेत. कृषी क्षेत्रात झालेला बदल जाणून घेण्याची संधी प्रशिक्षण घेताना तसेच देताना मिळाली, असे कृतिका राऊत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात उद्‍भवणाऱ्या अनेक समस्या, तसेच महाविद्यालयात कृषी संबंधित जे ज्ञान मिळाले आहे, ते ज्ञान अनुभवण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे मिळत आहे. आपण फक्त सुटीपुरतेच हे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमाने कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास मिळाल्या.
- कृतिका राऊत, कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी

संबंधित बातम्या