गोव्यात गेल्या तीन महिन्यांत झाल्या 300 पोलिसांच्या बदल्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पोलिस खात्यात कधी नव्हे ते एकापाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी पदाचा ताबा घेतल्यापासून बदल्यांची प्रक्रिया वेगवान झाली आहे.

पणजी :  पोलिस खात्यात कधी नव्हे ते एकापाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी पदाचा ताबा घेतल्यापासून बदल्यांची प्रक्रिया वेगवान झाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. बदलीचा आदेश कधी येईल, या चिंतेने अनेकजण धास्तावले आहेत. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 300 हून अधिक पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. 

गोवा नगरपालिका निवडणूक 20 मार्चला; आजपासून आचारसंहिता लागू

पोलिस खात्याचे प्रमुख या नात्याने पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी सर्व अधिकार आपल्याकडेच ठेवले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे पोलिस अधीक्षकांच्या अधिकारांवर गदा आली आहे. पोलिस उपअधीक्षक पदापासून ते साध्या पोलिस कॉन्स्टेबलपर्यंत बदल्यांबाबत ते निर्णय घेत आहेत. त्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. कधी बदली येईल याचा नेम नाही, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या सुमारे 43 जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्‍या. त्यापाठोपाठ आता सुमारे 125 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

का झाल्‍या बदल्‍या?

राज्यातील पोलिस ठाण्यामध्ये नव्या उमेदीच्या पोलिस अधिकाऱ्यांना ठाणे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. 2002 तसेच 2006 या सालच्या पोलिस तुकडीतील पोलिस उपनिरीक्षक हे सध्या निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. पोलिस महासंचालकांनी निरीक्षकांची निवड करताना त्यांची क्षमता व त्यांचा जनतेशी असलेला संपर्क याचा विचार करूनच निरीक्षकांच्या बदल्या काढण्यात येत आहेत. ठाण्यामध्ये महिला पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता असल्याने त्यांची ठाण्यामध्ये वर्णी लावण्यात आली आहेत. पाच वर्षांपूर्वी 71 महिला उपनिरीक्षकांपैकी 32 महिला उपनिरीक्षक निवड चाचणीत पात्र ठरल्या होत्या. त्यामुळे महिला पोलिस अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे. 

पोलिस स्‍थानकांचे काम होणार गतिमान

राज्यात गेल्या काही वर्षांपासून नव्या पोलिस स्‍थानकांचे काम संथगतीने सुरू आहे, ते पूर्ण करण्यासाठी पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा प्रयत्न सुरू केले आहे. काही पोलिस चौकी आहेत व तेथे पोलिस ठाणे करणे शक्य आहे, त्याचे रुपांतर करताना आवश्‍यक त्या साधनसुविधा उपलब्धेबाबत प्रयत्नशील आहेत. झुआरीनगर येथे नव्याने पोलिस ठाणे सुरू केले जाणार आहे, तर सांकवाळ येथील पोलिस चौकीचे रुपांतर ठाण्यामध्ये करण्यासंदर्भात हरकत घेण्यात आली आहे. साधनसुविधा व पुरेशी जागा नसताना पोलिस ठाणे सुरू करण्याला विरोध करून मानवाधिकार आयोगाकडे ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तक्रार दाखल केली आहे. त्‍या प्रकरणात मुख्य सचिव व महासंचालकांना नोटीस बजावण्यात आली 
आहे.

गोव्यात कोरोना नियंत्रीत; महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

...अशीही परिस्‍थिती!

खात्यातील अनेक विभागात एकाच ठिकाणी पाच वर्षाहून अधिक काळ ठाण मांडून असलेल्या तसेच कामाचा ताण कमी असलेल्या विभागात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना हलविण्यात आले आहे. काही राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागी काम करत होते व काहींना पोलिस ठाण्यातील कामाची प्रक्रिया व अनुभवही नाही, अशा काहीजणांची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. काही जण सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बढतीपर्यंत पोहचले आहे. मात्र, पोलिस ठाण्यात कामच केलेले नाही. काहीजण बदली होऊनही वारंवार एकाच ठिकाणी पुन्हा बदली करून घेत असल्याने त्या पोलिसांचा लेखाजोगा खात्यामार्फत सुरू झाला आहे.

संबंधित बातम्या