म्हापसा व्यापारी संघटनेच्या व्यवहारात पारदर्शकता

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

सचिव ॲसिस कार्दोज यांची माहिती,  ...तरच अध्यक्ष शिरोडकर यांना संघटनेचा पाठिंबा

म्हापसा:  म्हापसा व्यापारी संघटनेचा आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आहे. संघटना कुठल्याही प्रकारचे राजकारण करीत नाही. संघटनेने आजपर्यंत आर्थिक घोटाळा किंवा गैरवर्तन केलेले नाही. मागच्या अनेक सर्वसाधारण सभांना अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी हजेरी लावलेली नाही किंवा त्यांनी कधी पत्रव्यवहारही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी म्हापसा व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्यावर त्यांनी आरोप केले आहे. आशिश शिरोडकर यांनी स्वतः नारायण कारेकर यांच्यावर अब्रू नुकसानी खटला दाखल केला तरच त्यांना म्हापसा व्यापारी संघटनेचा पाठिंबा राहिल, अशी माहिती सचिव ॲसिस कार्दोज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी आशिष शिरोडकर, खजिनदार अमर कवळेकर, उपाध्यक्ष नरेश तिवरेकर, श्रीपाद सावंत, नागेश मयेकर, राजेंद्र पेडणेकर, रूपेश शिंदे, पीटर मास्कारेन्हास, पांडुरंग सावंत उपस्थित होते. 

सचिव ॲसिस कार्दोज यांनी सांगितले, संघटनेचा २०१९ पर्यंत हिशोब ऑडिटेड आहे. आम्ही आमच्या सर्व सभासदांना माहिती दिली होती. ज्या कुणाला हिशोबाची हवी त्यांनी दहा रुपये शुल्क भरून नेली पाहिजे. पण, नारायण कारेकर यांनी नेली नाही. तसेच संघटनेचा सभासद असूनसुध्दा सर्वसाधारण सभांना त्यानी नेहमी गैरहजेरी लावली आहे. 

अखिल गोवा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून नारायण (बाबा) कारेकर भूषवत आहे. पण, त्यांनी कधीच व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाहीत. किंवा त्यांनी म्हापसा व्यापारी संघटनेला संलग्न संस्था म्हणून नोंद केली नाही. आजपर्यंत अखिल गोवा व्यापारी संघटनेची सर्व साधारण सभा झाली नाही किंवा त्यांनी हिशेब सादर केला नाही. अशा व्यक्तीने म्हापसा व्यापारी संघटनेवर आरोप करू नये. नगरपालिका निवडणूक जवळ आल्यामुळे म्हापसा बाजारात राजकारण केले जाते. त्यामुळे व्यापारी वर्गात गोंधळ निर्माण झाला आहे. आम्ही आतापर्यंत किमान १० वेळा तरी पालिकेला निवेदन सादर करून व्यापाऱ्याच्या समस्या मांडल्या आहेत, असे सचिव कार्दोज यांनी सांगितले.

म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी सांगितले, ‘कोरोना’च्या काळात संपूर्ण जगामध्ये पैशाची टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्‍येक नागरिकांच्या हातात पैसा नसल्यामुळे ग्राहक गिऱ्हाईक घालण्यासाठी येत नाही ही वस्तुस्‍थिती आहे. नारायण कारेकर यांच्या मतानुसार, बाजारात पालिकेने गॅटस् व पे पार्किंग व्यवस्था चालू केल्यामुळे ग्राहक बाजारात येत नाही हा मुद्दा न पटणारा आहे.

नारायण कारेकर यांच्या दुकानासमोरील पदपथावर असलेला माल पालिकेने त्यांना काढण्यास सांगितल्यामुळे कारेकरचा तोल गेला आहे म्हणून त्यांनी बाजारातील फक्त १० व्यापाऱ्यांना घेऊन शिष्टमंडळ नगराध्यक्षांना परिसरातील ४० फेरी विक्रेत्यांना नेऊन आपली शक्ती दाखविण्याचा छोटा प्रयत्न केला आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले. 

बाजारातील पे-पार्किंग ठेकेदाराचे कर्मचारी बाजारात गैरवर्तन करतात. त्यांच्यावर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे. पे-पार्किंग व्यवस्था बाजारात केल्यामुळे शिस्त आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये निश्‍चित वाढ झाली आहे. मॉल सुपर मार्केट किंवा ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा म्हापसा बाजारातील व्यापाऱ्यांना गिऱ्हाईक घालावे. जेणेकरून या व्यापाऱ्यांना कोरोनाच्या काळात आर्थिक मदत होईल. म्हापसा पालिका बाजारात खरेदीसाठी येणे म्हणजे अत्यंत सुरक्षित खरेदी करता येईल येणाऱ्या काळात म्हापशातील काही व्यापारी सुट्ट योजना मार्गी लावणार आहे. या योजनेत नारायण कारेकर यांनी सहभाग घेण्याची गरज आहे. म्हापसा व्यापारी संघटनेची घटना नारायण कारेकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने तयार केली होती, तीच घटना आजपर्यंत आम्ही वापरतो. बाजारातील काही व्यापाऱ्यांना गिऱ्हाईक होत नसल्यामुळे संतूलन बिघडण्याची शक्यता आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवून व्यवहार करावा असे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी सांगितले.

संघटनेचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी सांगितले, नारायण कारेकर यांनी पूर्वी चांगले काम केले आहे. पण, त्यांनी कोरोना महामारीच्या काळात अखिल गोवा व्यापारी महासंघटेनच्यावतीने गोव्यातील व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले नाही. मागच्या अनेक वर्षांपासून महासंघटनेच्या निवडणुका किंवा हिशेब त्यांनी सादर केला नाही. आज म्हापसा शहरात बिगर गोमंतकीय फेरी विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. या बिगर गोमंतकीय फेरी विक्रेत्यांना नारायण कारेकर पाठिंबा देत आहेत. पालिकेने जाताना त्यांनी जास्त बिगर गोमंतकीय फेरी विक्रेत्यांना आपल्यासमवेत नेले होते. या प्रकारावरून त्याचा पाठिंबा बिगर गोमंतकीय फेरी विक्रेत्यांना आहे, हे सिद्ध होते असे तिवरेकर यांनी सांगितले.

पुढच्या वर्षीच्या सार्वजिक गणेशोत्सवासाठी आपल्याकडून महाप्रसादाचा खर्च उचलण्यात येणार आहे, याची घोषणा आपण आजच करतो. तेव्हा कुणीही त्या काळात संशय व्यक्त करू नये, असे आशिष शिरोडकर यांनी सांगितले.

पदपथ किंवा व्हरांडा यात व्यापाऱ्यांना पडायचे नाही
पालिका बाजारपेठेतील आमच्या दुकानासमोरील पदपाथवर आमच्या दुकानातील साहित्याची जाहिरात करू शकतो. म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार, आम्ही बाजारपेठच्या पदपाथावर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत नाही. काही व्यापारी ६० सेंटीमीटर जागेवर आपले सामान ठेवतात, त्याला अतिक्रमण म्हणू नये. पदपाथ किंवा व्हरांडा यामध्ये आम्हा व्यापाऱ्यांना पडायचे नाही, असे अध्यक्ष शिरोडकर म्हणाले.

आम्ही नगरपालिकेचे ऐकणार नाही...
राज्यसरकारने आम्हा दुकानाधारकाचे तीन महिन्याचे भाडे माफ करणार असे जाहीर करून सुध्दा आम्हाला भाडे वेळेवर न भरल्यामुळे भाडेपट्टीच्या रक्कमेवर जास्त व्याज आकारला आहे. त्यामुळे आम्ही नगरपालिका सांगणार ते ऐकणार नाही, असा इशारा अध्यक्ष शिरोडकर यांनी दिला.

बाजारभाव नियंत्रण ठेवण्यास सरकारला अपयश
‘कोरोना’च्या संकट काळात पहिल्या टाळेबंदीत काही कडधान्याच्या व्यापाऱ्यांनी जास्त भाव आकारून लोकांना लुटले होते, असे पत्रकारांनी विचारले असता, अध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले, या व्यापाऱ्यांवर सरकारच्या नागरीपुरवठा खात्याने कारवाई करण्याची गरज होती. पण, सरकारला या काळात बाजारभाव नियंत्रण ठेवण्यास अपयश आले.

‘महानाट्या’संबंधीचा हिशोब म्हापशातील जनतेकडे 
नारायण (बाबा) कारेकर हे म्हापसा बाजाराचे जाणता राजा आहेत. मागच्या काही वर्षांमागे बाबा कारेकर यांनी म्हापसा शहरात जाणता राजा हे महानाट्य आणले होते. या महानाट्यातील चांगल्या व वाईट गोष्टीचे बाबा कारेकर जबाबदार आहेत. या जाणता राजा या महानाट्य प्रयोगासंदर्भात काय घडले? व काय झाले याचे हिशेब म्हापसातील जनतेकडे आहे, असा  चिमटा अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी काढला.

संबंधित बातम्या