पर्वरीतील वाहतूक यंत्रणेला सीसीटीव्हीचीही गरज...!

वार्ताहर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

पर्वरी ते म्हापसा या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल यंत्रणा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत होत आहे. काहीवेळा वाहतूक पोलिसांचीही गरज भासत नाही.

पर्वरी: पर्वरी ते म्हापसा या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल यंत्रणा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत होत आहे. काहीवेळा वाहतूक पोलिसांचीही गरज भासत नाही. पण, या एकाही सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नसल्याने एखादा संशयित गुन्हेगार त्या ठिकाणाहून सहीसलामत पळून जाऊ शकतो. यामुळे पोलिसांना गुन्हेगार पकडणे शक्य होत नाही किंवा कोणत्या बाजूने पळून गेला याचे धागेदोरेही लवकर मिळत नाहीत. म्हणून पर्वरीतील वाहतूक यंत्रणेच्या ठिकाणी सीसीटीव्हीचीही गरज व्यक्त केली जात आहे.
 
पर्वरीच्या प्रत्येक ठिकाणच्या वाहतूक सिग्नलला सरकारने सीसीटीव्ही कॅमेरा बसवला तर चोऱ्या, अतिवेगाने वाहन चालविणे यांसारख्या प्रकारावर आळा बसेल. तसेच एखादा कोणी गुन्हा करून पळून जात असेल तर त्याचाही ठावठिकाणा लागू शकतो. सरकारने या सीसीटीव्ही कॅमेराचे देखरेख केंद्र पर्वरी पोलिस ठाण्यात ठेवल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. जेणेकरून एखादा गुन्हा घडला तर त्याची त्वरित माहिती मिळू शकते, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या वेळी या यंत्रणेचा खूपच फायदा होऊ शकतो. कारण काही तरुण विनाकारण रात्री-बेरात्री काम नसताना इकडे तिकडे फिरत असतात. त्यांच्यावरही आळा बसेल. 

सध्या गोव्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने स्वयंचलित वाहतूक सिग्नलला जोडून सीसीटीव्ही कॅमेराही बसवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

‘कोकेरो’सारख्या प्रमुख नाक्याच्या ठिकाणी एखादा फिरता सीसीटीव्ही कॅमेरा बसविला तर रात्रीच्यावेळी होणाऱ्या चोऱ्यांवर आळा बसू शकतो, असे लोकांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने वाहतूक खात्याने विचार करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या