वास्कोत कोळशाने पुन्हा डोके वर काढले

The transportation of coal has caused the spread of pollution
The transportation of coal has caused the spread of pollution

मुरगाव : वास्को आणि पर्यायाने राज्य भर वाढत चाललेले कोळसा प्रदूषण आटोक्यात आणले जाईल असे प्रत्येकवेळी सरकारकडून सांगितले जात असतानाही गेल्या काही दिवसांपासून वास्को शहर परिसरात प्रचंड प्रमाणात कोळसा प्रदूषणाने डोके वर काढले आहे. शहरांतून रस्तामार्गे होणारी कोळशाची वाहतूक प्रदूषण फैलावण्यास कारणीभूत ठरली आहे.


मुरगाव नगरपालिका मंडळाने ४ जानेवारी २०१६ रोजी वास्को शहरातील कोळसा वाहतूक बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला होता. त्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविला होता, पण आजपावेतो कोणतीच कारवाई न करता मुरगाव पालिकेचा प्रस्ताव सरकारने लालफितीत बंद करून ठेवला आहे. परिणामी कोळसा कंपन्या शेफारून गेल्या असून त्यांच्याकडून अमर्यादपणे आणि बेफिकीरपणे कोळसा वाहतूक सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून कोळसा वाहतुकीची मात्रा वाढल्याने प्रदूषणातही वाढ झाली आहे.


मुरगाव बंदरातून रस्तामार्गे दरदिवशी किमान ३०० ट्रकांमधून कोळशाची वाहतूक गोव्याबाहेर केली जात आहे. हे सर्व ट्रक वास्को शहरांतून मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ट्रकांमधून उडालेली कोळशाची भुकटी दुकाने, हाॅटेल्स, कार्यालये, निवासस्थानी सर्वत्र पसरली असून यामुळे जनता कमालीची अस्वस्थ झाली आहे. कोरोनाचे भय मनात असलेल्या वास्कोकरांना कोळसा प्रदूषणाने अधिक हैराण करून सोडले आहे.


वास्तविक वास्को शहरातून अवजड वाहने मार्गक्रमण करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले होते, पण त्याची पायमल्ली करून मिळेल त्या वेळेत कोळसा वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. वास्कोतील वाहतूक पोलिस किंवा आरटीओ विभागसुद्धा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणत हाताची घडी घालून गप्प बसले आहेत. या कोळसा वाहतुकीमुळे वाहतुकीची शहरात कोंडी होते तसेच अपघातालाही आमंत्रण दिले जाते हे सिद्ध झालेले असतानाही वास्को शहरांतून बिनधास्तपणे कोळसा वाहतूक सुरू आहे.


वास्को शहरांतून अवजड वाहनांची रेलचेल बंद व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.त्या अनुषंगाने वेर्णा ते मुरगाव बंदरपर्यंत वरुणापुरी बायणा, तारीवाडा ते सडापर्यंत शहर परिसर वगळून चौपदरी महामार्ग बांधण्यात येत आहे, पण हा प्रकल्पही अर्धवट ठेवण्यात आला आहे. तो पूर्ण करण्यासाठी कोणीच लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने वास्कोतील जनतेला मुरगाव बंदराकडे ये जा करणाऱ्या अवजड वाहनांचा प्रहार सहन करत दिवस मोजावे लागत आहेत. यामुळे कधी कधी गंभीर अपघातांचा सामना करून जीवही गमवावे लागत आहेत.धूळ प्रदूषण आणि प्राणघातक अपघात या दोन्हींचा सामना करीत वास्कोकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com