गाडीला काळ्या काचा लावाल..तर कारवाई होईल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

राज्यातील रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व मोटार वाहन कायद्यातील नियम मोडणाऱ्यांविरुद्ध वाहतूक खात्याने दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर विशेष मोहीम सुरू केली आहे.

पणजी : राज्यातील रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व मोटार वाहन कायद्यातील नियम मोडणाऱ्यांविरुद्ध वाहतूक खात्याने दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या १० दिवसांच्या काळात २१३१ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. त्यातील अधिक कारवाई वाहनांच्या काळ्या काचांप्रकरणी आहे. यामध्ये अधिक तर महागड्या व अलिशान वाहनांचा समावेश आहे. ही विशेष मोहीम दीपावलीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. 

गेल्या महिन्यात २० ते २९ ऑक्टोबर अशी दहा दिवसांची बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम वाहतूक पोलिस विभागातर्फे सुरू केली होती. राष्ट्रीय महामार्ग, किनारपट्टी परिसर तसेच शहरातील अंतर्गत रस्ते यावर अधिक भर देण्यात आला होता. आता पुन्हा ४ ते १३ नोव्हेंबरपर्यंत नव्याने मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

या मोहिमेत झिगझॅग लाईट, ओव्हरस्पिडिंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायकपणे वाहन हाकणे, दुचाकीवर दोनपेक्षा जादा स्वार बसणे, मोडाफाईड वाहने, पुलावरील ओव्हटेकिंग यांचा समावेश केला आहे. गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येऊ लागल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. ही मोहीम सकाळपासून ते रात्री मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावरील विविध ठिकाणी पोलिस तैनात करून सुरू असून अनेक वाहन चालक बेशिस्तपणे व मद्यप्राशन करून वाहने चालविताना आढळून येत आहेत, असे सलीम शेख यांनी सांगितले.

आलिशान वाहनांचाही समावेश 
राज्यात अलिशान व महागड्या वाहनांच्या काचा काळ्या (ब्लॅक टिंटेड) करण्यात आल्या आहेत. दिवसा ही वाहने क्वचितच बाहेर येतात. मात्र रात्रीच्यावेळी या काचा काळोखात दिसत नसल्याने सर्रासपणे त्याचा वापर केला जातो. त्यामुळेच गेल्या दहा दिवसांपूर्वी उघडण्यात आलेल्या मोहिमेवेळी एकूण ३४१५ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली त्यापैकी २१३१ प्रकरणे ही काळ्या काचासंदर्भात होती. वाहतूक पोलिस विभागाच्या १४ विविध कक्षामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. कळंगुट, फोंडा व कुडचडे या भागात या दहा दिवसांच्या मोहिमेवेळी ३०० हून अधिकजणांना दंड (चलन) देण्यात आला आहे. या मोहिमवेळी हेल्मेटसक्ती यावरही अधिक भर देण्यात आला आहे. वाहतूक पोलिस कक्षानी दंडात्मक कारवाई केली त्यामध्ये पणजी - २७९, म्हापसा - १८०, कळंगुट - ३९७, हणजूण - २५१, पेडणे - १५३, डिचोली - २३४, फोंडा - ३९६, मडगाव - २४१, वास्को - २५४, कुडचडे - ३७८, दाबोळी विमानतळ - २५२, कोलवा - २१९, काणकोण - १०२ व केपे - ७९ याचा समावेश आहे. राज्यात अजूनही खनिजवाहू ट्रकांचा व्यवसाय सुरू झालेला नाही. ही वाहतूक सुरू झाल्यावर ट्रक चालकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. 

विशेष मोहिमेंतर्गत पोलिस कारवाई 
गुन्हा प्रकारप्रकरणे नोंद 
भरधाववेग....................१०५
मोबाईल वापर................२३०
धोकादायकपणे...............१६८
वाहन चालवणे 
दुचाकीवर जादा स्वार..........५४८
वाहन काळ्या काचा..........२१३१
वाहन परवानाविना.............२३३

संबंधित बातम्या