borders will open
borders will open

उद्यापासून आंतरराज्य वाहतूक थर्मल स्क्रिनिंगची सक्ती, पण कोरोना चाचणीला पर्याय अलगीकरण

पणजी, 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून आंतरराज्य वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी राज्य सरकारने नियमावली लागू केलेली असून जर गोव्यात यायचे असेल, तर प्रथम थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल, त्यानंतर जर त्या व्यक्तीला कोरोना पडताळणी चाचणी करायची असेल तर २ हजार रु. देऊन करावी लागेल. अन्यथा १४ दिवस सक्तीने अलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. याचाच अर्थ राज्यात येणाऱ्या व्यक्तीसमोर कोरोना पडताळणी चाचणी आता पर्यायी होणार आहे.
राज्यात येताना त्यांचे थर्मल स्क्रिनिंग सक्तीने होईल. नंतर जर त्या व्यक्तीला चाचणी करायची असेल, तर चाचणीचा निकाल येईपर्यंत त्याला राज्यात प्रवेश नसेल. चाचणी निगेटिव्ह आली, तर त्याला राज्यात सोडले जाईल. पॉझिटिव्ह आली, तर लगेच कोविड रुग्णालयात भरती केले जाईल. ज्या व्यक्तीला चाचणी करून घ्यायची नाही, त्या व्यक्तीने १४ दिवस क्वारंटाईन होणे सक्तीचे असेल. या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारून आरोग्य अधिकाऱ्यांकडून नजरही ठेवली जाईल. राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जाणार असल्याने त्या व्यक्तीला संपर्क करणे सोपे जाणार आहे. ज्यांच्याकडे गोव्यातील पत्ता नसेल, ते लोक गोव्यात कोणाकडे येत आहेत, कोणत्या ठिकाणी थांबत आहेत, याची माहिती घेणार असल्याचे मोहनन म्हणाल्या.

एसओपीचे नियम पाळूया
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) म्हणजेच सुयोग्य हाताळणी प्रक्रिया यशस्वी करून राज्याला आदर्श म्हणून पुढे आणूया, अशी भूमिका घेतली आहे. विमानातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मानांकित प्रयोगशाळेचे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे सक्तीचे असल्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एसओपीचे नियम पाळल्यास कोरोनाचे ट्रान्समिशन थांबवणे शक्य होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गोवा ग्रीन झोनच आहे. कारण राज्यामध्ये कोरोनाचा सामुदायिक प्रसार (ट्रान्समिशन) झालेले नाही. केंद्र सरकारच्या यादीतही गोव्याची नोंद ग्रीन झोन अशी आहे. गोव्यात आढळलेले रुग्ण प्रवासी असून त्यांच्याकरवी राज्यात कोरोनाचा प्रसार झालेला नसल्याने गोवा ग्रीन झोनच असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com