मंगेशी-म्हार्दोळात ट्रकचालकांचा मुक्त वावर

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

कुंडई औद्योगिक वसाहतीत तर परराज्यातील ट्रकांची बिनधास्त वाहतूक सुरू आहे. या औद्योगिक वसाहतीत बहुतांश प्रकल्प सुरू झाले असून कच्चा माल घेऊन येण्याबरोबरच गोव्यातून इतर राज्यात माल घेऊन जाणाऱ्या ट्रकांची वर्दळ वाढली आहे.

मडकई

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एकीकडे चिंता व्यक्त केली जात असून फोंडा तालुका भागातील औद्योगिक वसाहतीत सामान घेऊन येणाऱ्या परराज्यातील ट्रकचालकांची कोरोनासंबंधीची कसून चाचणी करण्याची मागणी होत आहे. औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या ट्रकांचे चालक व क्‍लिनर बिनधास्तपणे बाजार परिसरात फिरत असून उकाड्यामुळे रात्रीच्यावेळी उघड्यावरच झोपत आहेत.
कुंडई औद्योगिक वसाहतीत तर परराज्यातील ट्रकांची बिनधास्त वाहतूक सुरू आहे. या औद्योगिक वसाहतीत बहुतांश प्रकल्प सुरू झाले असून कच्चा माल घेऊन येण्याबरोबरच गोव्यातून इतर राज्यात माल घेऊन जाणाऱ्या ट्रकांची वर्दळ वाढली आहे.
या ट्रकचालकांची केवळ कागदोपत्री तपासणी केली जात आहे. थर्मल गनने तपासणी केल्यानंतर शरीराचे तापमान तेवढे मोजता येते, मात्र या तपासणीवेळी ताप नसेल तर राज्यात अशा लोकांना बिनधास्त प्रवेश मिळत आहे. कुंडई, म्हार्दोळ, मंगेशी भागात अशा अवजड ट्रकांची संख्या बरीच वाढली आहे. ट्रकवरील चालक क्‍लिनर उकाड्यामुळे उघड्यावरच झोपत आहेत. त्यातच या लोकांना स्वच्छतेच्यादृष्टीने कोणत्याही सुविधा नाहीत. मूळात ट्रक टर्मिनस नसल्यामुळे हे लोक उघड्यावर शौचविधी करीत असल्याने हा धोका वाढला आहे. कोरोनाशी संबंधित यंत्रणेने अशा ट्रकचालकांची कसून तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या