आदिवासी समाज कोविडविरुद्ध लढण्यास सज्ज

Tejashree Kumbhar
रविवार, 9 ऑगस्ट 2020

आदिवासी समाजात काही प्रथा आणि परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आल्या आहेत, ज्यामुळे हा समाज कोविडसारख्या धोक्यापासून स्वतःला वाचविण्यास समर्थ ठरत आहे. शिवाय आदिवासी समाजाला शुद्ध अन्न, शुद्ध हवा मिळत असल्याने या लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही अतिशय चांगली असते. असे असले तरी देशासह गोवा ज्या कोविड संकटाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामध्ये अनेक आदिवासी बांधव कोविड योद्धे म्हणून अग्रणी असल्याची माहिती गोवा आदिवासी समाजाचे नेते डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दिली.

पणजी
जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज असून आदिवासी समाज या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वांसमोर पाय रोवून उभा असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जागतिक आदिवासी‌ दिनानिमित्त यंदा ‘कोविड महामारी व आदिवासी लोकांचो रोगप्रतिकारणक शक्ती आणि सामर्थ्य’ या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेचे आयोजन अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी फेडरेशनतर्फे गोव्यातही आयोजन करण्यात आले आहे. देशपातळीवरील या चर्चेत गोव्यातील आदिवासी समाजातील दोन वैद्य या चर्चेत सहभागी होणार आहेत.
१९८२ पासून सयुक्त राष्ट्र महासंघ दरवर्षी ९ ऑगष्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करते. त्यानिमित्त एका ठरलेल्या विषयावर जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतात गोव्यासह आठ राज्यांत हा दिवस शासकीय पातळीवर साजरा केला जातो. यातील काही राज्यात या दिवशी सार्वत्रिक सुट्टीही दिली जाते. यंदाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासंघाने आजच्या दिवसासाठी ‘कोविड-१९’ व ‘आदिवासींचे रोगसामना सामर्थ्य’ हा विषय जाहीर केला‌ आहे.

राज्यस्तरीय संवाद कार्यक्रम
जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोवा राज्य अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी फेडरेशनतर्फे एक राज्यस्तरीय संवाद कार्यक्रम बोरी-फोंडा येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पारंपरिक उपचार करणारे आदिवासी‌ वैद्य शाबू गावकर व नारायण वेळीप यांच्याशी याच समाजातील आधुनिक डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. यात आधीच्या‌ काळात आदिवासी साथीच्या रोगाचा कसा सामना करायचे हे त्यांच्याकडून जाणून घेण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात वैद्य व डॉक्टरांचा तसेच महामारी काळात आपल्या समाज बांधवांसाठी मदत करणाऱ्या काही समाज वांधवांचाही सन्मान करण्यात येईल, असे फेडरेशनने जाहीर केले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या