'अन्याय व अत्याचाराविरुद्ध बहुजन समाजामधूनच नेतृत्व तयार करा'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

सोशित समाजावर होत असलेला अन्याय ही चिंतेची बाब बनलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी अजूनही सोशित समाजाची व्यथा संपलेली दिसत नाही. ती दूर करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. खास करून महिलांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.

मुरगाव- आपल्या देशामध्ये सोशित घटकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्या बहुजन समाजामधूनच नेतृत्व तयार करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक सैफुल्ला खान यांनी केले.

केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पास्वान यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील जनता वाचनालय सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की  देशातील सोशित समाजावर होत असलेला अन्याय ही चिंतेची बाब बनलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी अजूनही सोशित समाजाची व्यथा संपलेली दिसत नाही. ती दूर करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. खास करून महिलांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.

गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी आपल्या भाषणामध्ये देशातील पाच पंतप्रधानांच्या हाताखाली मंत्री म्हणून काम केलेले स्व. पास्वान हे एकमेव नेते असून केंद्र सरकारतर्फे दिल्ली किंवा बिहार राज्यामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी दलित सेनेतर्फे ठराव समंत करून पाठविण्याचे आवाहन केले.

भारतीय बौद्ध महासभा गोवा राज्य प्रमुख एस.के. जाधव यांनी पास्वान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून देशातील अनेक दलित नेत्यांवर कमी वयामध्ये मृत्यू आलेला असून त्यामुळे सोशित समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब बनसोडे, गोवा शिक्षण अभियानचे अध्यक्ष डॉ. उल्हास चांदेलकर, महिला व बाल विकास कल्याण खात्याचे अधिकारी दिलीप कुडाळकर, मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील व पत्रकार संतोष खोर्जुवेकर यांची पास्वान यांना श्रध्दांजली वाहणारी भाषणे झाली.

दलित सेना गोवा प्रमुख मनोहर धारगावे यांनी आपल्या भाषणामध्ये काही आठवणी विषद केल्या. किशोर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एक मिनिट शांतता पाळून पास्वान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संबंधित बातम्या