साखळीत एका घरावर ट्रक कोसळला ; याआधीदेखील काही गाड्या या घराला येऊन धडकल्या होत्या

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

विठ्ठलापूर-साखळी येथे जीवघेणा अपघात घडून चोवीस तास उलटण्याआधीच त्याच परिसरात एका घरावर ट्रक कलंडण्याची घटना घडली. हा अपघात काल पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

डिचोली :  विठ्ठलापूर-साखळी येथे जीवघेणा अपघात घडून चोवीस तास उलटण्याआधीच त्याच परिसरात एका घरावर ट्रक कलंडण्याची घटना घडली. हा अपघात काल पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात घराशेजारील वीज खांबही मोडले. घराची तसेच आतिल किमती साहित्याची मोडतोड झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. अपघात घडला, त्यावेळी घरातील मंडळी घरात झोपली होती. मात्र सुदैवाने या अपघातात मात्र जिवीतहानीसारखी विपरीत घटना घडली नाही. 

याबाबत माहिती अशी की, एमएच-१२ एमव्ही-६६९१ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक साखळीच्या दिशेने जात होता. विठ्ठलापूर येथे उतरणीवर चालकाचे नियंत्रण गेल्यानंतर ट्रकाने सरळ वीज खांबांला धडक देवून तो डाव्या बाजूने सुनील नाईक यांच्या घरावर कलंडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घरातील मंडळी घाबरुन घराबाहेर आली. नागरिकांनी धावपळ करून केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरुप बाहेर काढले. या अपघातात घराची मोठ्या प्रमाणात मोडतोड होवून भिंती खचल्या. घरातील फ्रिज, दूरदर्शन संच आदी किमती साहित्याची मोडतोड झाली. या घटनेत आपले दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सुनील नाईक यांनी दिली. यापूर्वीही या घराला वाहनांची धडक बसण्याच्या घटना घडल्या आहेत.

संबंधित बातम्या