ट्रकमालक संघटनेची खनिज वाहतुकीसाठी दर वाढवण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

गेल्या पाच वर्षांपूर्वी खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी निश्‍चित केलेला खनिज दर रद्द करून आताचा नवीन सुधारित दर लागू करावा, अन्यथा कुणीही ट्रकमालकांनी खनिज माल भरण्यासाठी आपला ट्रक रस्त्यावर आणू नये, असे आवाहन यावेळी सभेत करण्यात आले.

धारबांदोडा: खनिज वाहतुकीसाठी या ‘सिझन’मध्ये प्रती टन प्रती किलोमीटर २६ रुपयेप्रमाणे निर्धारित करताना डिझेल दर बाजारभावाप्रमाणे द्यावा, अशी जोरदार मागणी धारबांदोडा येथे आज (रविवारी) झालेल्या ट्रकमालक संघटनेच्या सभेत करण्यात आली. 

कळसई - धारबांदोडा येथे सभागृहात झालेल्या या सभेला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री  दीपक पाऊसकर उपस्थित होते. या सभेला धारबांदोडा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष विनायक गावस, सेझा कंपनी ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी, शिगाव ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वेळीप व दाभाळ ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष देविदास परब उपस्थित होते. 

गेल्या पाच वर्षांपूर्वी खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी निश्‍चित केलेला खनिज दर रद्द करून आताचा नवीन सुधारित दर लागू करावा, अन्यथा कुणीही ट्रकमालकांनी खनिज माल भरण्यासाठी आपला ट्रक रस्त्यावर आणू नये, असे आवाहन यावेळी सभेत करण्यात आले.

यावेळी बोलताना विनायक गावस यांनी सेझा कंपनीच्या खनिज माल वाहतुकीसाठी उत्तर व दक्षिण गोव्यातील ट्रक चालतात. मात्र नफा तुटपुंजा होत असल्याने चालक, ट्रकाचा खर्च आणि दुरुस्तीसह सरकारी कर भरायचे कसे असा सवाल केला. प्रत्येक ट्रकाला महिन्याकाठी किमान पंचवीस खेपा मिळायला पाहिजेत, असा आग्रह विनायक गावस यांनी धरला. खनिज माल वाहतुकीचा पैसा संबंधित कंपन्या व सरकारला मिळतो, मात्र ट्रकवाल्यांचा वापर केला जातो, असा आरोपही यावेळी करण्यात आला. राज्यातील खाणी सुरू होणार की नाही, हे कळण्यासाठी येत्या दहा दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी ट्रकवाल्यांशी बैठक घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची ट्रक व्यावसायिकांना वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मागच्या वेळेला ट्रकवाल्यांना चांगला दर मिळाला. आताही मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली. 

वल्लभ दळवी यांनी राज्यातील खनिज खाणी पूर्ववत सुरू होण्याची मागणी करताना सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. केवळ लीलावाचा खनिज माल वाहतूक करून ट्रक व्यावसायिक आपली रोजीरोटी चालवू शकत नसल्याचेही दळवी यांनी सांगितले. 

ट्रक व्यावसायिक नीलेश वेळीप यांनी खनिज माल वाहतुकीचा ठेका इतरांना न देता थेट कंपनीनेच स्वतः वाहतूक करावी, त्यामुळे निर्धारित दर देणे शक्‍य होईल, असे सांगितले. एकनाथ गावस यांनी ट्रक वाहतुकीत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही केला. 

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी शेवटी ट्रकमालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आपला नेहमीच ट्रक व्यावसायिकांना पाठिंबा असेल असे जाहीर केले. यापूर्वीही आपण पाठिंबा दिला होता, व पुढेही देऊ असे सांगताना ट्रक व्यवसायिकांच्या समस्या आणि व्यथांची आपल्याला जाणीव असून गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांकडे बोलणी करून योग्य निर्णय घेऊ असे सांगितले. ट्रकमालकांना वाहतुकीसाठी ठेकेदार नको असल्यास आपण कंपनीकडे त्यासंबंधी बोलणी करू, मात्र सर्व ट्रक व्यावसायिकांच्या संघटनांनी एकसंध रहावे, असे आवाहन दीपक पाऊसकर यांनी केले. दर वाढवून देण्यासाठी आपण खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी बोलणी करणार असून, दर वाढलाच पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ठेकेदाराचा अट्टाहास सोडताना दर वाढवा, अशी मागणी ट्रकमालकांनी केली. 

मागच्या आंदोलनावेळी सहा ट्रकमालकांवर गुन्हा नोंदवला होता, या आरोपातून त्यांची सुटका झाली असल्याची माहिती देऊन विनायक गावस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व संमत झाला. सभेचे सूत्रसंचालन मोहन गावकर यांनी केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या