विद्यार्थांमधील कलागुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा: प्रवीण आर्लेकर

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

आज सर्वच क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणातून आम्हा सर्वांना प्रगती करायची आहे.

पेडणे : आज सर्वच क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणातून आम्हा सर्वांना प्रगती करायची आहे. शिक्षण नसेल तर स्पर्धात्मक युगात आम्ही टिकू शकणार नाही. त्यासाठी शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्‍व आहे. कुणाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांचे शिक्षण अडता कामा नये. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योजक प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथे केले.

कोरगाव येथील श्री कमळेश्वर युनायटेडतर्फे कोरगावातील शालान्‍त परीक्षेतील व बाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात  प्रवीण आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री कमळेश्वर सभागृहात देऊळवाडा कोरगाव येथे आयोजित केलेल्या सोहळ्याला अध्यक्षस्थानी युवा उद्योजक आणि मगोचे नेते जीत आरोलकर, मोपा सरपंच सरस्वती नाईक, कोरगावचे माजी सरपंच सुदीप कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, श्री कमळेश्‍वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुदन बर्वे, मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी, शिक्षक देवानंद गावडे, उगवेचे उपसरपंच सुबोध महाले, देवस्थान अध्यक्ष मंगेश थळी यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

 यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत व बारावीच्या परीक्षेत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या दीक्षा नर्स, दिशन डायस, अँथोनी डिसोझा, नादिशा रोझारीयो, भार्गव मांद्रेकर, शौनक बर्वे, उषा शेट्ये, रुची मांद्रेकर, गौरी गोसावी, प्रथमेश गावडे, सिब्बल मेंडोसा, माबले फर्नांडिस, सना पोळजी, स्टेला मेंडोसा, सिद्धी वेंगुर्लेकर, उमा गावडे, सौरभ नाईक, इशा तोरस्कर, रुपल शेट्ये, शेजल गोडकर, प्रीती केरकर, अमर शिरोडकर, शेजल पार्सेकर, अनिशा शेट्ये, सखाराम गावडे, नलिनी परब, तृप्ती कलशावकर, प्रज्योत पेडणेकर, अरविला हिरोजी, विल्‍सन फर्नांडिस, मिनीनो डिसोझा व दिव्या कोरगावकर या दहावी व बारावीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व प्रमाणपत्र भेट देऊन गौरव केला.

जीत आरोलकर म्हणाले की, सर्वच विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात, काही विद्यार्थी कला, क्रीडा क्षेत्रासह अन्‍य क्षेत्रात प्रगती साधू शकतात. अशा  विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्यांचे गुण आत्मसात करून चौफेर प्रगती आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.

यावेळी उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यालयातील शिक्षकांचा स्मृतिचिन्ह भेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद वेगुर्लेकर यांनी, देवानंद गावडे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या