चतुर्थीपूर्वी कोकण रेल्वेमार्ग खुला करण्याचे प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

कोसळलेली भिंत हटवताना आणखीन कोणता भाग कोसळू शकतो की काय, याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्याठिकाणी काम करताना खूपच काळजी घ्यावी लागत असल्याने वेगाने काम उरकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

पणजी: कोकण रेल्वेच्या मालपे येथील बोगद्यात कोसळलेली संरक्षक भिंत अद्याप हटवण्यात आलेली नाही. तो बोगदा भिंत हटवताना कोसळू नये यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी कोकण रेल्वेमार्ग खुला करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली.

 

ते म्हणाले, हा बोगदा खोदण्याच्या वेळेपासून त्रासदायक ठरला होता. आताही तेथे पाण्याचा मोठा प्रवाह आहे. त्यामुळे कामात अडथळा येत आहेत. बोगद्याच्या छताला आणि भिंतींना टेकू लावण्याचे काम सध्या सुरू आहे. कोसळलेली भिंत हटवताना आणखीन कोणता भाग कोसळू शकतो की काय, याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्याठिकाणी काम करताना खूपच काळजी घ्यावी लागत असल्याने वेगाने काम उरकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

 

या कामावर सध्या ७०-८० मजूर आहेत. रत्नागिरी आणि कारवार येथील कोकण रेल्वेची अभियांत्रिकी पथके पेडण्यात दाखल झाली. सरव्यवस्थापक (कामे) गोपाळ राजू हे साऱ्यावर देखरेख ठेवत आहेत. एकदा भिंत व छत यांना टेकू लावून झाले की, कोसळलेल्या भिंतीचे अवशेष दूर करणे सुरू करण्यात येईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त लोहमार्गाची पाहणी करतील आणि सर्वकाही योग्य असल्यास खुला करण्यास परवानगी देतील.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या