गोव्यात त्सुनामी येणार होती का?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

सरकारने इशारा दिला म्हणजे ती गोष्ट खरी असेल असे अनेकांना वाटले. दुपारी अडीच वाजता त्सुनामी येणार, असा इशारा दिल्याने त्यानंतर लोकांनी माध्यम प्रतिनिधींना त्सुनामी कुठे धडकली अशी विचारणा करणे सुरू केले

पणजी-राष्ट्रीय पातळीवर कुठेही त्सुनामीचा इशारा नाही, माध्यमांमध्येही राष्ट्रीय पातळीवर तशी चर्चा नाही. असे असतानाही आज गोव्‍यात त्सुनामी आली का? याची विचारणा अनेक ठिकाणांहून झाली. सरकारने त्सुनामी आल्यानंतर करावयाच्या उपाययोजना आणि मदतीचा सराव करण्यासाठी त्सुनामी येणार, अशी खोटी माहिती प्रसारीत केली खरी मात्र ती खरी मानली गेली.

सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याकरवी ही माहिती प्रसारीत करण्यात आली, एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून ती माहिती प्रसारीत करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर काही माध्यमांनीही त्याची दखल घेतली. सरकारच माहिती देत असल्याने इन्कॉयसिस जी संस्था देशासाठी त्सुनामीचा इशारा देण्यासाठी अधिस्वीकृत केलेली आहे, त्या संस्थेचे संकेतस्थळ पाहण्याची तसदीही अनेकांनी घेतली नाही. त्यामुळे आजची सकाळच राज्यात आज त्सुनामी येणार या विचाराने उजाडली.

दुपारी त्सुनामी येणार आणि ती केवळ गोव्यातच कशी येणार, असा प्रश्न अनेकांना पडत होता. उत्तरेत आधी गुजरात नंतर महाराष्ट्र तर दक्षिणेत आधी तमिळनाडू, केरळ व त्यानंतर कर्नाटकाला त्सुनामीचा तडाखा बसल्यानंतर गोव्याकडे त्सुनामी वळेल असे असताना थेट ती गोव्याकडे कशी येईल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. तरी सरकारने इशारा दिला म्हणजे ती गोष्ट खरी असेल असे अनेकांना वाटले. दुपारी अडीच वाजता त्सुनामी येणार, असा इशारा दिल्याने त्यानंतर लोकांनी माध्यम प्रतिनिधींना त्सुनामी कुठे धडकली अशी विचारणा करणे सुरू केले. हा त्सुनामीचा इशारा सरकारी यंत्रणेच्या सरावाचा भाग होता. मात्र त्सुनामीच्या भीतीने दिवसभर लोक तणावाखाली होते.

संबंधित बातम्या