Goa Diwali Festival : तुळशी विवाहाची ‘लगीनघाई’

बाजारपेठा सजल्या : ऊस, आवळा, चिंच, दिणा बाजारात दाखल
Tulsi marriage hurry
Tulsi marriage hurry dainik gomantak

पणजी : कार्तिक शुक्‍ल द्वादशीपासून राज्यात तुळशी विवाहाला आरंभ होतो. ज्याला ‘देव दिवाळी किंवा ‘मोठी दिवाळी’ असेही म्‍हणतात. राज्यभरात दिवाळीनंतर आता तुळशी विवाहासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तुळशीवृंदावन सजविणे तसेच रंगविण्‍यासाठी गावागावांत रात्री जागू लागल्या आहेत. बाजारात तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे. हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे.

तुळशी विवाहात नवरदेव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दिण्या, आवळा, चिंच, ऊस, पोहे, लाह्या, चुरमुरे (चिरमुले), पूजेसाठी लागणारे साहित्य, जोडवी आदी साहित्य दाखल झाले असून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात वाढ झालेली आहे. राज्यातील ग्रामीण भागात तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असल्याने अनेक जण आपल्या शेतातून, परसातून हे दिणे आणतात. त्यावर कोरीव काम केले जाते. ही प्रथा आजही ग्रामीण भागात टिकवून ठेवलेली आहे. युवावर्ग तुळशी विवाहासाठी तयारी करण्यात व्यस्त असल्‍याचे दिसून येत आहे.

तुळशीवृंदावन रंगविण्यात युवक व्यस्त

काही वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबाच्या अंगणात मातीची तुळस पाहायला मिळायची. परंतु आता काळ बदलला आणि प्रत्येकाच्या अंगणात सिमेंटच्या विविध प्रकारच्या सुंदर कलाकुसर केलेली तुळशीवृंदावने साकार झाली. आता या मातीच्या तुळशी दिसणे देखील दुर्मिळ होत आले आहे. तुळशी विवाहाअगोदर अंगण (खळे) करत असत. नंतर तुळशीला चिकण मातीद्वारे किंवा शाडूच्या मातीद्वारे तयार करून त्‍यावर रंगकाम केले जायचे. मात्र आता काळ बदलला आणि घरेही बदलली. आता सर्वत्र सिमेंटच्या तुळशी पाहायला मिळतात. त्‍या रंगविण्यासाठी विविध प्रकारच्‍या ऑईल पेंटचा वापर केला जातो. सध्‍या सगळीकडे तुळशीवृंदावने रंगवण्‍यात युवक मग्न असल्‍याचे दिसत आहे.

ऊस १०० रुपये एक

तुळशी विवाहासाठी ऊस लागतोच. त्यामुळे विक्रीस आलेल्या ऊसाचे दर वधारले आहेत. १०० रुपये एक याप्रमाणे ऊस विकला जात आहे. त्यामुळे ऊस खरेदी करताना नागरिकांना विचार करावा लागत आहे. दिणा आणि चिंच, आवळा मिळून तयार केलेली जुडी ५० रूपये अशी विकली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com