गोव्यात थोरल्या दिवाळीची लगबग सुरू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मोठी थोरली दिवाळी म्हणून तुळशीविवाह उत्सव दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरा होत असून कार्तिक पौर्णिमा म्हणजे रविवारी २९ पर्यंत लोक आपल्या घरी तुळशीविवाह साजरा करतात. 

शिरोडा : दसरा, दिवाळी उत्सव साजरा होत असतानाच उत्सवप्रिय नागरिकांना वेध लागले ते कार्तिक एकादशी आणि तुळशीविवाहाचे. मोठी थोरली दिवाळी म्हणून तुळशीविवाह उत्सव दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरा होत असून कार्तिक पौर्णिमा म्हणजे रविवारी २९ पर्यंत लोक आपल्या घरी तुळशीविवाह साजरा करतात. 

दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्याची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते. तुळशीच्या लग्नानिमित्त अंगणातील तुळशीवृंदावनाची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याच्या कामाला आता प्रारंभ झालेला आहे. 

तुळशीविवाहासाठी दिंडा, उस, चिंचा, आवळे, आदीबरोबरच पोहे चुरमुरे लागतात. बाजारात तुळशीच्या लग्नाचे साहित्य उपलब्ध होऊ लागले आहेत. बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांकरवी तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न केले जाते. त्यानंतर सुवासिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात. तुळशीच्या लग्नानिमित्त एकमेकांच्या घरी जाऊन तुळशीपत्र साजरे केले जाते.

संबंधित बातम्या