कोकण रेल्वेकडून बोगद्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी बोगद्याचा माथ्यावर तुंबल्याने ६ ऑगस्ट रोजी मालपेच्या बाजूची बोगद्याची भिंत कोसळली होती.

पेडणे: मालपे-पेडणे येथील कोकण रेल्वेच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरूस्तीचे काम सध्या जोरात सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी बोगदा खुला करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी बोगद्याचा माथ्यावर तुंबल्याने ६ ऑगस्ट रोजी मालपेच्या बाजूची बोगद्याची भिंत कोसळली होती. वास्तविक रित्या मालपेच्या बाजूने असलेला अर्ध्याअधिक भाग हा तसा पूर्वी भूमार्गात पाण्याचे मोठे साठे असलेला भाग. १९९४-९५ मध्ये जेव्हा येथे बोगद्याच्या कामाला सुरवात झाली होती, तेव्हा खोदकाम करताना पाण्यामुळे समस्या निर्माण निर्माण होऊन बोगद्याच्या कामात व्यत्यय येत होता.

बोगद्यातील पाणी काढण्यासाठी त्यावेळी ॲमिस्टर हे अद्ययावत यंत्राचा वापर करावा लागला होता. बोगद्याच्या उत्खननामुळे भू मार्गातील पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन पाणी एखाद्या धबधब्याप्रमाणे  बोगद्याच्य दुसऱ्या बाजूने म्हणजे खाजनेच्या बाजूने वहावू लागले. तर बोगद्याच्या जवळ असलेल्या अमय ह्या वाड्यावरील भूअंतर्गत पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने या वाड्यावरील विहिरी आटल्या. माड-फोफळींच्या बागायती सुकून नष्ट झाल्या.

सध्या बोगद्याची भिंत कोसळली आहे. तो तसा जलसाठ्याचा स्पॉट. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यावर येथे बोगद्याच्या माथ्यावर मुरलेल्या पावसाच्या पाण्याबरोबर चिखल खाली येतो. गेले काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बोगदा दुरुस्तीच्या कामाला वेग आला होता. पण, हल्ली परत अधून पावसाच्या जोरदार सरी येत असल्याने त्याचा परिणाम बोगद्याच्या कामावर होतो.

शंभर कामगार करताहेत काम
बोगद्यावर भिंत कोसळल्यानंतर लगेच दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी कोकण रेल्वेच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वे व कंत्राटदाराचे मिळून सुमारे शंभर कामगार काम करत आहेत. जेसीबीद्वारे चिखल माती काढण्याचे काम सुरू आहे. तर कोसळलेल्या भिंतीच्या भागात व कमानीला इंग्रजी उलट्या यु आकाराचे स्टील रॉड लावून नंतर त्यावर प्लास्टरिंग करण्यात येणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या