‘कोरोना’ पॉझिटिव्‍हमुळे हळद पडली महागात!

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

फोंडा पोलिस स्थानकातील हळदी समारंभासाठी आलेला ‘तो’ पोलिस पॉझिटिव्ह ठरला आणि नवरदेवाच्या घरच्या मंडळींची एकच धावपळ उडाली. सांगे आरोग्य केंद्राने तपासणी केली असता नवरदेवाचे वृद्ध वडील पॉझिटिव्ह आढळून आले. त्‍यानंतर गावातील शंभरपेक्षा अधिक लोकांचे तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या गावातील सर्वांची, नातलगांची चाचणी करण्यात येणार आहे.

कुडचडे :

सावर्डे मतदारसंघातील काले ग्रामपंचायत क्षेत्रातील पोकरमळ येथील नवरदेवाच्या हळदी समारंभाला फोंडा येथून नातलग (पोलिस) आला. सोबत ‘त्या’ पोलिसाचे आई - वडील आले. गावातील, नात्या-गोत्यांतील पै-पाहुणे मंडळी जमली आणि लग्नाचा हळदी समारंभ थाटात साजरा केला. दुसऱ्या दिवशी कळसई येथे लग्नसोहळा मोठ्या उत्साहात आणि दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत झाला. हा विषय येथेच संपला नाही. खरी हळद मारक ठरली, ती तिसऱ्या दिवशी.
फोंडा पोलिस स्थानकातील हळदी समारंभासाठी आलेला ‘तो’ पोलिस पॉझिटिव्ह ठरला आणि नवरदेवाच्या घरच्या मंडळींची एकच धावपळ उडाली. सांगे आरोग्य केंद्राने तपासणी केली असता नवरदेवाचे वृद्ध वडील पॉझिटिव्ह आढळून आले. त्‍यानंतर गावातील शंभरपेक्षा अधिक लोकांचे तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या गावातील सर्वांची, नातलगांची चाचणी करण्यात येणार आहे.

काहींचे अहवाल आज मिळणार...
सोमवारी ६५ जणांची तपासणी करून नमुने गोळा केले. त्‍यांचे अहवाल उद्यापर्यंत मिळण्‍याची शक्‍यता आहे. तसेच आरोग्‍य खात्‍याने काले पंचायत क्षेत्रातील ज्‍या ज्‍या भागातून लोक लग्‍न समारंभाला सहभागी झाले होते. तेथे फवारणी करण्‍यात येणार आहे. तसेच संशयितांचे तपासणी नमुने घेण्‍यात येणार आहे. हा विषय इथेच संपत नाही. सांगे मतदारसंघातून अनेक लोक उपस्‍थित राहिले होते. त्‍यांचीही तपासणी अद्याप झालेली नाही. तिथून काहीजण पॉझिटिव्‍ह मिळाले, तर ही हळद आणि लग्‍न महागात पडणार आहे.

‘त्‍यां’चीही तपासणी व्‍हावी!
कोरोनाच्या या महामारीत लग्न सोहळ्यासाठी दोन्ही बाजूने मिळून पन्नासजणांना परवानगी सरकारने या पूर्वीच दिली होती. पण, या लग्नाला नवरदेवाला आशीर्वाद देण्यासाठी की मतांचा जोगवा प्राप्त करण्यासाठी म्हणून राजकारणातील दिग्गज मंडळी आवर्जून उपस्‍थित राहिली. त्यात गोव्यातील आजी - माजी खासदार, सावर्डे मतदार संघातील आजी - माजी मंत्री - आमदार, सरपंच असा लवाजमा जमला होता. मतांच्‍या बेगमीसाठी काही आजी माजी आमदार उपस्‍थित राहिले होते, अशीही चर्चा सुरू आहे. आता काहीजण कोरोना पॉझिटिव्‍ह सापडल्‍याने त्‍या राजकीय मंडळींचीही तपासणी होणे आवश्‍‍यक आहे.

संबंधित बातम्या