अंगावरील लग्नाची ‘हळद’ उतरण्यापूर्वीच...

तुकाराम सावंत
रविवार, 9 ऑगस्ट 2020

लग्नाच्या बोहल्यावर चढून सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्यापूर्वीच आणि अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच, कोरोनारुपी क्रूर काळाने घाला घातलेल्या कुडणेतील ‘त्या’ नवविवाहित युवकाच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

डिचोली
लग्नाच्या बोहल्यावर चढून सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्यापूर्वीच आणि अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच, कोरोनारुपी क्रूर काळाने घाला घातलेल्या कुडणेतील ‘त्या’ नवविवाहित युवकाच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात मयत युवकाच्या पार्थिवावर साखळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी रुग्णालयातून मयत युवकाचा मृतदेह थेट साखळी येथील स्मशानभूमीत आणण्यात आल्यानंतर कोविड योद्यांच्या सहकार्याने अंतिमसंस्कार करण्यात आले. 
एकाबाजूने नवविवाहित युवकाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्‍त होत असतानाच, मयत युवकाच्या संपर्कात आलेल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मयत युवकाच्या लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्यांची तर झोपच उडाली आहे. त्याच्या संपर्कातील ११७ जणांची आज (शनिवारी) साखळी सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे स्वॅब चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

नियतीचा क्रूर खेळ..! 
गुरुवारी रात्री उशिरा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात फाळवाडा-कुडणे (ता. डिचोली) येथील जल्मी कुटुंबातील ३० वर्षीय युवकाचे निधन झाले होते. या युवकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोरोना महामारीचा बळी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यंत वेदनादायी आणि मनाला चटके लावणारी बाब म्हणजे, मयत युवकाचा चार दिवसांपूर्वी विवाह झाला होता. प्रेमसंबंधातून मयत युवकाचे कुडणे गावापासून जवळच्याच एका गावातील युवतीबरोबर मागील रविवारी (ता. २) लग्न झाले होते. ‘कोरोना’मुळे शुभकार्यावर निर्बंध आले असले, तरी वधू-वराकडील मंडळींच्या संमतीने मोजक्‍यात नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह विधी पार पडला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. लग्नानंतर नवविवाहीत दाम्पत्याची सुखी-संसाराची स्वप्ने रंगविण्याची वेळ असतानाच, विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहीत युवकाची तब्येत बिघडल्याने त्याला बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा संबंधित युवकाचे गोमकॉत निधन झाले. अन्‌ नवदाम्पत्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मयत युवकाच्या मागे आई-वडिल, विवाहित बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. नवविवाहीत युवकाचा बळी ही घटना गावातील लोकांसह अनेकांच्या मनाला चटके देणारी ठरली आहे. नियतीचा हा क्रूर खेळ असल्याची प्रतिक्रिया असल्याची प्रतिक्रिया प्रत्येकजण व्यक्‍त करीत आहेत.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या