लस घेतल्यानंतर 48 तासात मृत्यू; गोव्यातील तरुणाचे शवविच्छेदन इन कॅमेरा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

कोरोनाचा फैलाव मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. मागील चोवीस तासांत तब्बल 200 नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज सकाळीच कोरोना नियंत्रणासाठी सरकार सर्व उपाय करत असल्याचे सांगितले होते.

पणजी : कोरोनाचा फैलाव मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. मागील चोवीस तासांत तब्बल 200 नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज सकाळीच कोरोना नियंत्रणासाठी सरकार सर्व उपाय करत असल्याचे सांगितले होते. तसेच आज दरदिवशीपेक्षा 1 हजार अतिरिक्त कोरोना तपासणी (2352) केल्यामुळे 200 नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांत एका दिवसात दीडशेच्यावर नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले नव्हते. आज सापडलेल्या 200 नव्या कोरोना रुग्णामुळे राज्यात कोरोना संसर्गीत रुग्णांची संख्या दीड हजारांच्या पार (1556) झाली आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 2352 कोरोना चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या. त्यात 200 नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले, तर आज दिवसभरात फक्त 62 कोरोना संसर्गीत रुग्ण बरे झाले. आज दिवसभरात एका कोरोना संसर्गीत रुग्णाचा मृत्‍यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे राज्यात मृत झालेल्‍यांची संख्या 830 वर पोहोचली आहे. दोन महिन्यात पहिल्यांदा करोना संसर्गीत रुग्ण बरे होण्याची टक्कवारी 96 टक्केपेक्षा खाली आली असून आज ती 95.89 टक्के झाली. आत्तापर्यंत 55.653 कोरोना संसर्गीत व्यक्ती बरे झाले आहेत. राज्यातील पुढील ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गीत सापडत असून सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या व्यक्तीमधील 173 मडगाव आरोग्य केंद्रातील, 165 पणजी आरोग्य केंद्रातील, 130 पर्वरी आरोग्य केंद्रातील, 121 फोंडा आरोग्य केंद्रातील, 114 कांदोळी आरोग्य केंद्रातील,108 वास्को आरोग्य केंद्रातील आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणाच्या हेतूने 144 कलम जाहीर केलेले असले, तरी जमावबंदीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हजारोंच्या संख्‍येने गोव्यात दाखल होणारे देशी पर्यटक जमावबंदी पाळताना दिसत नाहीत. कोरोना रुग्‍णांचे 24 तासांत ‘द्विशतक’

‘त्या’ युवकाचे शवविच्छेदन इन कॅमेरा

गमेकॉच्‍या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानात एका 32 वर्षीय युवकाला कोविशिल्ड कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याची तब्येत खालावली. त्याला गोमेकॉत दाखल करून उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 48 तासांत त्याचा मृत्यू झाल्यामुळे लोकांत अफवा पसण्याचा धोका होता. त्यासाठी आरोग्य खात्याने त्‍या तरुणाच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्‍छेदन करण्याचा निर्णय घेतला. गोमेकॉतील तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाने हे शवविच्‍छेदन केले. त्यात डॉक्टरांना सदर तरुणाला मूत्रपिंडाचा आजार होता, असे दिसून आले. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्या तरुणाचे निधन झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे. गोव्यात कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 48 तासांत मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

संबंधित बातम्या