फोंडा ‘आयडी कोविड’ इस्पितळात सत्तावीस कोरोना रुग्णांना केले भरती

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

फोंड्यातील कोविड इस्पितळात फोंड्याशी संबंधित रुग्णांची चांगली सोय होणार आहे. आतापर्यंत फोंडा तालुक्‍यातील कोरोना रुग्णांना मडगावला पाठवावे लागायचे. पण, आता फोंड्यातच आयडी उपजिल्हा इस्पितळात ही सोय झाल्याने कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे हेलपाटे थांबणार असून कोरोना रुग्णांना आवश्‍यक सुविधाही त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांकडून मिळू शकते. आरोग्य खात्याने फोंड्यातील रुग्णांना फोंड्यातच ठेवणे सोयिस्कर ठरणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी. - रवी नाईक, (आमदार, फोंडा)

फोंडा: राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी फोंड्यात असलेल्या आयडी उपजिल्हा इस्पिळात आज (बुधवारी) पहिल्याच दिवशी सत्तावीस कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मडगावातील कोविड इस्पितळावर ताण पडत असल्याने फोंड्यातील हे इस्पितळ पूर्णपणे कोविड इस्पितळ करण्यात आले असून राज्यातील फोंड्यातील हे दुसरे कोविड इस्पितळ ठरले आहे.

 

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात दिवसभरात सत्तावीस कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फोंड्यातील या इस्पितळात कोरोना रुग्णांवर कोरोना तसेच इतर उपचारांसाठी सोयिस्कर ठरेल यासाठी हे इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून जाहीर करून त्यात आता कोरोना रुग्णांची भरती करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

 

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा आहेत. त्यामुळे या सुविधांचा वापर कोरोना रुग्णांवर कोविडसंबंधी तसेच इतर उपचारासंबंधीही उपयुक्त ठरणार आहे. त्यातच फोंड्यातील हे कोविड इस्पितळ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बहुतांश लोकांना सोयिस्कर ठरणार आहे.

 

फोंड्यातील या कोविड इस्पितळासाठी डॉक्‍टर व परिचारिका तसेच इतर कर्मचारीवर्ग तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, फोंड्यातील आयडी उपजिल्हा कोविड इस्पितळ जाहीर केल्यानंतर तालुका तसेच लगतच्या इतर भागातील लोकांची अन्य आरोग्य तपासणीसाठी गैरसोय होऊ नये यासाठी फर्मागुढीतील दिलासा इस्पितळाची सोय करण्यात आली असून या इस्पितळात आज (बुधवारपासून) रुग्ण तपासणी सुरू झाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या