मुख्यमंत्री व केजरीवालांमध्ये रंगले ट्विटरवॉर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. केजरीवाल यांनी ट्विटरवरून कोळसा वाहतूकीमुळे गोव्यातील प्रदूषणात वाढ होणार आहे, अशा परिस्थितीत जंगलांचे संवर्धन करणे गरजेचे असताना त्यांची हानी करणारे प्रकल्प केंद्र सरकार राज्यावर लादत आहे. याला विरोध करणाऱ्या जनतेसोबत सर्वांनी उभे राहावे असे आवाहन केले.

याला प्रत्युत्तर देताना सावंत यांनी गोव्यातील प्रदूषण रोखण्यासाठी गोवा सरकार सक्षम आहे. उपाययोजना केल्या जात आहेत. केजरीवाल यांनी गोव्या सारखेच प्रदूषणमुक्त वातावरण दिल्लीतील जनतेला द्यावे, दिल्लीतील जनतेची तशी अपेक्षा आहे, असा टोला लगावला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांसाठी केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेचे या आठवड्यात कौतुक केले होते आणि राज्यातील भाजपा सरकार जनआंदोलने दडपत असल्याचा आरोप केला होता.

कोळसा क्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांचा बहुराष्ट्रीय कंपन्यांनाच फायदा होईल, या कारणास्तव तीन मुख्य प्रकल्पांविरोधात विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या निषेधाचा संदर्भ दिल्लीचे मुख्यमंत्री बोलत होते. गोव्यातील कोळशाच्या हाताळणीची क्षमता वाढविण्याच्या या निर्णयावरही निदर्शकांनी चिंता व्यक्त केली होती.

केजरीवाल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की दिल्लीमध्ये गेल्या काही वर्षात प्रदूषण ही मोठी चिंता बनली आहे. "मी दिल्लीत होतो आणि आजच परतलो. हवाची गुणवत्ता किती वाईट आहे हे मी पाहिले आहे. गोव्याबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या राज्याबद्दल काळजी केली पाहिजे”, असे सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या