स्वप्नील वाळके खून प्रकरणी तिघांना अटक; मुख्‍य संशयित पोलिसांना शरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

स्वप्नील यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडलेला व सुऱ्याने वार केलेला मुस्तफा शेख हा मुख्‍य संशयित मडगाव पोलिसांना आज शरण आला.

मडगाव: मडगावचा सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके (४१ वर्षे) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेने वेगाने तपास करून गुन्हेगारांचा छडा लावला. या प्रकरणी एडसन गोन्साल्‍विस, ओमकार पाटील या संशयितांना पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेने उत्तररात्री अटक केली. त्‍यानंतर त्यांना आज सकाळी मडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्‍यात आले. स्वप्नील यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडलेला व सुऱ्याने वार केलेला मुस्तफा शेख हा मुख्‍य संशयित मडगाव पोलिसांना आज शरण आला. इव्हान्डर रॉड्रिग्ज हा चौथा संशयित अद्याप गायब असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

स्वप्नील यांचा बुधवारी दिवसाढवळ्या मडगावच्या मध्यवर्ती भागातील सराफी दुकानात खून करण्यात आला. स्वप्नील यांच्यावर झालेला हल्ला व गुन्हेगार स्वप्नील यांच्या पकडीतून सुटून पळ काढत असल्याची घटना दुकानाच्या आतील सीसीटीव्ही कॅमेरात व एका नागरिकाने मोबाईलवर काढलेल्या व्हिडिओद्वारे चित्रित झाली आहे. स्वप्नील यांच्यावर मुस्तफा या संशयिताने आधी देशी कट्ट्याने गोळी झाडल्याचे व नंतर सुऱ्याने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मडगाव पोलिसांकडून आज दिवसभर अटक केलेल्या तिघाही संशयितांची चौकशी सुरू होती. गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेने संशयितांना पोलिसांच्‍या स्वाधीन केल्यानंतर आज सकाळी एडसन व ओमकार या संशयितांना मडगाव पोलिस स्थानकात आणण्यात आले. त्यानंतर मुस्तफा मडगाव पोलिसांनी शरण आला.

कारवाईच्या भीतीने मुस्‍तफा शरण
पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखा पथकाने एडसनला याला सांताक्रूझ येथून ताब्यात घेतले. त्‍यानंतर मिळालेल्‍या माहितीवरून ओमकार पाटील याला उत्तररात्री मिरामार परिसरात अटक केली. मुस्तफा हाही याच परिसरात दडून बसला होता. तथापि, पोलिस कारवाईचा सुगावा लागल्याने त्याने तिथून पळ काढला. गुन्‍हा अन्‍वेषण गुन्‍हे शाखा पोलिसांना मुस्‍तफा शरण न आल्‍यास कठाेर कारवाई होणार, या भितीमुळे मुस्तफा मडगाव पोलिसांनी शरण आला. 

खुनामागील गूढ कायम!
मडगाव पोलिसांकडून उशिरा रात्रीपर्यंत संशयितांची बंद दाराआड ही चौकशी सुरू होती. तसेच प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे पोलिस अधिकाऱ्यांनी टाळल्याने खुनामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर स्वप्नील यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला. संध्याकाळी मडगाव स्मशानभूमीत स्वप्नील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नील यांच्या खुनाचा निषेध व त्यांना श्रद्धांजली म्हणून मडगावसह गोव्यातील सर्व सराफी दुकाने आज बंद राहिली. म्‍हापशातही आज सराफी दुकाने बंद ठेवण्‍यात आली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या