मडकईत ट्रक, दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

अपघातानंतर दोन्‍ही वाहने पेटली; ट्रकचालकाने उडी मारल्‍याने सुदैवाने बचावला

मडकई

मडकई - कुंडई बगल रस्त्यावर मालवाहू ट्रक व मोटरसायकलच्या यांच्‍यात झालेल्‍या जोरदार टकरीत दोघेजण जागीच ठार झाले. हा अपघात आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. अपघातात ठार झालेले दोघेही युवक जुने गोवे येथील रहिवासी असून त्यांची नावे आकाश महादेव होसमणी (वय १९) व रितेश चंद्रकांत कुडीनूर (वय २०) अशी आहेत. अपघातानंतर मोटारसायकल व ट्रक जळून खाक झाले.
अपघातात ठार झालेले दोघेही युवक मडकई येथील एका औद्योगिक आस्थापनात नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांबरोबर आणखी एका मोटरसायकलवरून त्यांचे मित्रही नोकरीसाठी आले होते. हे मित्र पुढे होते, तर त्यांच्यामागून अपघातग्रस्त युवक मोटरसायकलने येत होते. कुंडई - मडकईच्या या प्रशस्त रस्त्यावरील वळणावर भरधाव मोटरसायकलची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला ठोकर बसली.
मडकई औद्योगिक वसाहतीतून जुने गोवे येथे जी. ए. ०७ एडी ९१४२ या क्रमांकाच्या मोटरसायकलने हे दोघेही युवक जुने गोवे येथे परतत होते, तर लोखंड वितळविण्यासाठी वापरण्यात येणारे अवजड रॉड घेऊन जी.ए. ०५ टी १४९२ या क्रमांकाचा ट्रक मडकई औद्योगिक वसाहतीतील लोह प्रकल्पाकडे जात होता.

असा झाला अपघात...
मडकई - कुंडई येथील बगल रस्त्यावरील वळणावरच या दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात मोटरसायकलवरील स्वार आकाश होसमणी व रितेश कुडिनूर यांच्या डोक्‍याला जोरदार इजा होऊन ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने लगतचे लोक धावत घटनास्थळी आले. रस्त्यावरून जाणारी वाहनेही यावेळी थांबवण्यात आली. समोरासमोर टक्कर झाल्याने मोटरसायकल ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांच्यामध्ये अडकली. दुपारचा वाढलेला पारा, त्यातच दुचाकीमधील इंधनाला गळती लागल्याने अचानकपणे दुचाकीने पेट घेतला. ही आग ट्रकच्या केबिनला लागली. प्रसंगावधान राखून घाबरलेल्या ट्रकचालकाने बाहेर उडी घेतली व लांब पळाला त्यामुळे तो बचावला. ट्रकचालकाचे नाव रामबळी भजनाथ चौधरी (वय ४४) असे असून त्याला फोंडा पोलिसांनी अटक केली.
आग वाढल्याने मोटरसायकलच्या टाकीचा मोठा स्फोट झाला. यावेळी अग्निशामक दलाला कळवल्यानंतर पाण्याचा बंब वापरून आग विझवण्यात आली. फोंडा पोलिसांना या अपघाताची माहिती देताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांची फौजच अपघातस्थळी दाखल झाली व त्यांनी परिस्थिती हाताळली. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून शवचिकित्सेसाठी मृतदेह बांबोळी इस्पितळात पाठवले. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

 

 

संबंधित बातम्या