काणकोणात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले

dainik Gomantak
सोमवार, 6 जुलै 2020

काणकोणात आज दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. हे दोन्ही रुग्ण शनिवारी पोळे व पर्तगाळ येथे सापडलेल्या रुग्णांशी संबंधित आहेत. पोळे व पर्तगाळ येथील करोनाबाधित युवकांच्या माता कोरोनाबाधित झालेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत काणकोणात कोरोनाबाधितांची संख्या १२ झाली आहे. यापूर्वी पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

काणकोण
काणकोणात शनिवारी चार कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. या चार रुग्णांपैकी दोन पर्तगाळ येथील असून ते दोघे भाऊ आहेत. तिसरा रुग्ण पोळे येथील आहे, तर चौथा रुग्ण गुळे येथील असून तो बाळ्ळी आरोग्य केंद्रात कामाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला कोविड इस्पितळात सेवा बजावण्यासाठी पाठवले होते. पर्तगाळ व पोळे येथे सापडलेल्या रुग्णांपैकी दोघे वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला होते. ते ज्या आस्थापनात काम करीत होते, त्या अस्थापनातील काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी करोनाची लागण झाली होती. पर्तगाळ येथील एक भाऊ वेर्णा येथे काम करीत होता त्याच्या संसर्गाने दुसरा भाऊ कोरोना पोझिटिव्ह झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शनिवारी ६६ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह सापडले आहेत.
पोळे येथील तो युवक आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पोळे येथे आला होता. त्यावेळी तो व पर्तगाळ येथील युवक अनेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता गृहीत धरून आज ६० व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या