गोव्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

Tejashree Kumbhar
रविवार, 9 ऑगस्ट 2020

राज्यातील कोरोनाबाबतची स्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. आज (शनिवारी) आणखी दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजवर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ७२ वर पोहचली आहे.

पणजी

आज राज्यात एकूण २५९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि २०७ जण कोरोनमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २३३२ इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण असून १३०८ जणांच्या कोरोना पडताळणी चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
आज ज्या दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात म्हापसा येथील ७४ वर्षीय महिलेचा समावेश असून या महिलेला शुक्रवारी रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. तेथेच या महिलेचा मृत्यू झाला, तर करासवाडा - म्हापसा येथील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोविड इस्पितळात झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६८ जणांना ठेवण्यात आले, तर तीन देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. २३२४ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत, तर २३१८ जणांचे अहवाल हाती आहेत.
दरम्यान, राज्यात रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ७ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात २४, साखळी आरोग्य केंद्रात ७७, पेडणे आरोग्य केंद्रात ४७, वाळपई आरोग्य केंद्रात ८५, म्हापसा आरोग्य केंद्रात ८५, पणजी आरोग्य केंद्रात ९८, बेतकी आरोग्य केंद्रात १८, कांदोळी आरोग्य केंद्रात ५७, कोलवाळे आरोग्य केंद्रात ४९, खोर्ली आरोग्य केंद्रात ७२, चिंबल आरोग्य केंद्रात १००, पर्वरी आरोग्य केंद्रात ४९, कुडचडे आरोग्य केंद्रात ३९, काणकोण आरोग्य केंद्रात २२, मडगाव आरोग्य केंद्रात १८०, वास्को आरोग्य केंद्रात ३७२, लोटली आरोग्य केंद्रात ४४, मेरशी आरोग्य केंद्रात ३४, केपे आरोग्य केंद्रात ३५, शिरोडा आरोग्य केंद्रात २९, धारबंदोडा आरोग्य केंद्रात ४६, फोंडा आरोग्य केंद्रात १२८ आणि नावेली आरोग्य केंद्रात ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.

राजधानी पणजीवरील संकट होतेय गडद...
राजधानी पणजीतील कोविडचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आरोग्य खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज राजधानी पणजीत कोविडचे ९ नवे रुग्ण आढळले. यामध्ये रायबंदर, आल्तिनो, मळा येथील रुग्णांचा समावेश आहे. आल्तिनो येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. पणजी आरोग्य केंद्रात ९८ रुग्ण असून हा आकडा काळजीत टाकणारा आहे. दुसऱ्या बाजूला राजधानी पणजीत जेथे रुग्ण आढळतील तेथे अग्निशमन दलाला कल्पना देत निर्जंतुकीकरण केले जात आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या