आणखी दोघांचा बळी

Tejshri Kumbhar
सोमवार, 13 जुलै 2020

रविवारी चिखली वास्को येथील एक ८० वर्षीय महिला आणि काणकोण येथील एका ४९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यात ५ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत राज्यात १४ जणांचे मृत्यू झाले आहेत. आज ८५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर ५९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात ९५२ कोरोना रुग्ण असल्‍याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली.

तेजश्री कुंभार

पणजी : राज्यात कोरोनाचा संसर्ग एका बाजूला वाढतच चालला आहे, तर दुसऱ्या बाजूला मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी चिखली वास्को येथील एक ८० वर्षीय महिला आणि काणकोण येथील एका ४९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यात ५ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत राज्यात १४ जणांचे मृत्यू झाले आहेत. आज ८५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर ५९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात ९५२ कोरोना रुग्ण असल्‍याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली.
आजच्या दिवशी २ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आणि ११ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २८, तर १३७४ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले. २४१३ जणांचे अहवाल हाती आले असून यातील २५९५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२३ रुग्ण आहेत, तर मांगोरहिल परिसरातील ७६ आणि मांगोरहिलशी संबंधित २९४ रुग्ण आहेत. केपे येथे १७ रुग्ण, लोटलीत ३१, नावेलीत ६, साखळीत ३६, काणकोण येथे ९, राय येथे ३, कुंडई, नुवे, आगशी, करंजाळे, म्हार्दोळ, थिवी, कुजिरा, सांताक्रूझ, बेतालभाटी, बांबोळी, खोर्ली, कुंभारजुवे, कोलवा येथे प्रत्येकी एक रुग्ण, मडगाव येथे ९ रुग्ण, गंगानगर म्हापसा येथे ७, साखळीत ३६, कामराभाट टोंका ६, काणकोणात ९, मोतिडोंगर ७, फोंड्यात ४०, वाळपईत २२, माशेलात ५, उसगावात ५, गोवा वेल्हा येथे ६, बेतकी येथे ४२, सांगेत ४, पर्वरीत ५, कुंकळ्ळी १२, धारबांदोड्यात २०, मंडूर येथे ९, नेरुल २३ रुग्ण आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

संसर्गस्‍थळे रुग्‍ण
सडा ८८
बायणा ११०
कुडतरी ३२
बेतकी ४२
नवेवाडा ८३
चिंबल ६३
मोर्ले २२
खारेवाडा ५२
झुआरीनगर १४६

रुग्‍णसंख्‍या वाढल्‍याने लोकांत घबराट
एका बाजूने कोरोना संसर्ग झालेल्‍यांचा मृत्‍यू होत आहे, तरीही सरकार सामाजिक संसर्ग नाही, असे सांगून लोकांना सावधगिरी बाळगण्‍याचे आवाहन करीत आहे. मात्र, दिवसेंदिवस रुग्‍णसंख्‍या वाढत असल्‍याने लोकांत घबराट निर्माण झाली आहे. रविवारी नेरुल व खांडोळा मायक्रो कंटेन्‍मेंट नव्‍याने जाहीर केला आहे. तसेच मांगोरहिल बायणात कोरोनाबाधितांची संख्‍या ११० वर पोहोचली, तर झुआरीनगरमध्‍ये ही संख्‍या दीडशेच्‍या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तसेच सडा, नवेवाडे, चिंबल, खारेवाडा येथे पन्नाशीचा टप्‍पा ओलांडला आहे. ही संख्‍या वाढत असल्‍याने संसर्ग कसा रोखणार असा प्रश्‍‍न सरकारसमोर आहे. डॉक्‍टर कोरोना रुग्‍णांवर उपचार करीत असून गेल्‍या २४ तासांत ५९ रुग्‍णांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

हळदणवाडा - खांडोळा
मायक्रो कंटेन्‍मेंट झोन
हळदणवाडा-खांडोळा येथे मायक्रो कंटेन्‍मेंट झोन जाहीर केला आसून आज पोलिस व आरोग्य अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून ग्रामस्थांना त्यासंदर्भात माहिती दिली. या परिसरात रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी ही संख्या ३२ असल्याची माहिती मिळाली. येथे सध्या ६ कुटुंबांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

आठवडाभर माशेल बंद!
माशेल, खांडोळा परिसरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे ग्रामस्थांनी परिसरात टाळेबंदी करावी, अशी माशेलच्या ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार आज पंचायत मंडळाच्या बैठकीत सोमवार १३ जुलैपासून आठ दिवस बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले. बैठकीनंतर माशेल परिसरात फिरून टाळेबंदी (बंद) संदर्भात व्यापारी, ग्रामस्थांना माहिती दिली.

सत्‍यता पडताळूनच
वक्तव्‍ये करा : आरोग्‍यमंत्री
आमदार रोहन खंवटे यांनी कोरोना इस्पितळातून ५०० जणांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे विधान केले होते. आज केवळ ५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. हे रुग्ण कोरोनामुक्त झालेले कोरोना उपचार केंद्र आणि कोरोना इस्पितळातील असल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि नियमांचे पालन करूनच रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. माझी आमदारांना विनंती आहे की, कोणतेही विधान करण्यापूर्वी त्यांनी सत्यता पडताळून पाहावी, असेही राणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या